जळगाव । भाजपच्या नेतृत्वावर आणि विशेषत: देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करत राष्ट्रवादीत आलेले एकनाथ खडसे आता पुन्हा एकदा भाजपमध्ये घरवापसी करत आहेत. मात्र या सगळ्यात नाथाभाऊंची लेक रोहिणी खडसे यांची पुढची राजकीय भूमिका काय असेल? अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती. याबाबत रोहिणी खडसे यांनी एक ट्विट केलं आहे. यात त्यांनी स्पष्टपणे आपण शरद पवार यांच्या सोबतच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशाच्या घोषणेमुळे राज्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे. रोहिणी खडसे या सुद्धा वडिलांसोबत भाजपप्रवेश करणार काय? असा प्रश्न उपस्थित झाला होता. परंतु ॲड. रोहिणी खडसे यांनी ट्वीट करत म्हणाल्या, “आपण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करीत आहोत, मी याच पक्षात आहे. भविष्यातही याच पक्षात राहणार आहे. यात त्यांनी तुतारी फुंकत असलेला आपला फोटोही जोडला आहे.
दरम्यान, रोहिणी खडसे या राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा असून त्यांनी आपले वडिल आमदार एकनाथराव खडसे यांच्या थेट विरूध्द भूमिका घेत पक्षातच राहण्याचे जाहीर केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. येत्या काही महिन्यात विधानसभा निवडणूक होणार असून विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील हे शिवसेनेच्या तिकिटावर मुक्ताईनगरातून उभे राहिल्यावर आपल्याला भाजपमधून तिकिट मिळणे अवघड असल्याचे त्यांनी जाणून घेतले असावे. यातूनच त्यांनी शरद पवार गटातच राहण्याचा निर्णय घेतला असावा असे मानले जात आहे.
Discussion about this post