मुंबई । अमेरिका,इराण,इराक या देशांमध्ये सुरू असलेल्या योद्धाचा फटका भारतातील गॅस पुरवठ्यावरती मोठ्या प्रमाणात जाणवू लागला असून, हॉटेल व्यावसायिकांना गॅसचा पुरवठा बंद करण्यात आल्यामुळे हॉटेल व्यवसायिकांना हॉटेल बंद करण्याची वेळ आली आहे. दरम्यान, गॅसच्या या तुटवड्यावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले असून अशातच शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी सरकारला थेट इशारा दिला आहे.
मध्य पूर्वेतील युद्धामुळे निर्माण झालेल्या गॅस टंचाईचा फटका आता भारतातील सामान्य नागरिकांनाही बसू लागल्याचा दावा रोहिणी खडसे यांनी केला आहे. मुंबई-पुणेसारख्या शहरांमध्ये गॅसच्या अभावामुळे हॉटेल्स आणि खानावळी हळूहळू बंद होत असल्याचे त्यांनी सांगितले.
खडसे म्हणाल्या की, मुंबई-पुणे परिसरात ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. गॅस टंचाईमुळे खानावळी बंद पडल्यास या विद्यार्थ्यांवर उपासमारीची वेळ येऊ शकते. परिस्थिती अशीच राहिली तर पुढील काळात घरगुती गॅसचाही तुटवडा निर्माण होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.
या पार्श्वभूमीवर शासनाने तात्काळ गांभीर्याने लक्ष घालून उपाययोजना कराव्यात, आवश्यक असल्यास केंद्र सरकारशी चर्चा करून तोडगा काढावा, अशी मागणी त्यांनी केली. अन्यथा परिस्थिती गंभीर झाल्यास विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला.















Discussion about this post