जळगाव । राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आमदार एकनाथ खडसे पुन्हा भाजपात वापसी करणार आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर खडसेंच्या या निर्णयाने राष्ट्रवादीला धक्का बसला आहे. यातच शरद पवार गटाच्या काही पदाधिकाऱ्यांकडून कनाथ खडसेंचा आमदारकीचा राजीनामा घ्या, अशी मागणी त्यांच्या कन्या आणि राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांच्याच समोर करण्यात आली
पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मात्र, तो निर्णय ‘साहेबां’चा असल्याचे सांगत तो विषय थांबवला. त्यानंतर पक्षाचे स्थानिक पदाधिकारी आपल्याला प्रचारात विश्वासात घेत नाहीत, बॅनरवर आपला फोटो वापरत नाहीत, अशी तक्रार रोहिणी यांनी केली. त्यावर ‘असे करू नका’ असे सांगून प्रदेशाध्यक्ष रवाना झाले. जयंत पाटील शनिवारी जळगाव शहरात येत आहेत, हे पक्षाच्या अत्यंत निवडक नेते आणि पदाधिकाऱ्यांनाच सांगण्यात आले होते.
एका विशेष हेलिकॉप्टरने त्यांचे शहरात आगमन झाले आणि तिथून थेट ते हॉटेलवर गेले. तिथे अत्यंत मोजक्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांनी बैठक घेतली. रोहिणी खडसेही बैठकीला हजर होत्या. रावेर लोकसभा मतदारसंघात प्रचारात नियोजन व्यवस्थित करा, गटबाजी करू नका अशा सूचना त्यांनी उपस्थितांना दिल्या आणि त्यानंतर ते निघून गेले. उद्योजक श्रीराम पाटील यांना राष्ट्रवादीने उमेदवारी जाहीर केल्यानंतर पक्षातील अंतर्गत विरोध उफाळून आला आहे. भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी यांनी तर उमेदवारी दाखल करण्याचा निर्णयही जाहीर केला आहे
चोपड्यात गटबाजी
चोपडा विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेसकडून डॉ. चंद्रकांत बारेला व डी.पी. साळुंखे यांनी तयारी सुरू केली आहे. लोकसभा निवडणूक निमित्ताने दोघेही चोपडा मतदार संघात प्रचार करीत असून दोन वेगवेगळे गट सक्रीय झाल्याची बैठकीत चर्चा झाली. दोघांनी वेगवेगळे न फिरता एकत्र प्रचार करण्याचा सल्ला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडून देण्यात आला.















Discussion about this post