जळगाव । महाविकास आघाडीचे नेते शरद पवार यांसह विविध नेत्यांकडून विधानसभा निवडणुकीच्या निकालावर संशय व्यक्त केला जात आहे. यामध्ये प्रामुख्याने वरिष्ठ नेत्यांनी ईव्हीएम मशीनची विश्वासार्हता उपस्थित केली आहे. ईव्हीएम मशीन विषयी अनेकांनी संशय व्यक्त करीत, आंदोलनाची तयारी देखील सुरू केली आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी धक्कादायक दावा केला आहे.
रोहिणी खडसे मुक्ताईनगर मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या उमेदवार होत्या. त्यांच्या विरोधात शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील उमेदवार होते. या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर सत्तेचा दुरुपयोग झाल्याची चर्चा होती.आता या संदर्भात रोहिणी खडसे यांनी एक धक्कादायक विधान केले आहे.
रोहिणी खडसे म्हणाल्या, विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होण्याआधीच माझ्या प्रतिस्पर्धी उमेदवाराने त्यांना किती मते मिळणार, याविषयी समाज माध्यमांवर मतप्रदर्शन केले होते. निवडणुकीचे निकाल जाहीर होण्याआधीच एखाद्या उमेदवाराला आपल्याला किती मते मिळणार, हे तो कसे समजू शकते. हा अत्यंत गंभीर प्रश्न आहे.
निकालाआधीच एक यादी सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आली होती. त्यात प्रतिस्पर्धी उमेदवाराने मला अमुक अमुक मते मिळतील, अशी गॅरंटी व्यक्त केली होती. या यादीतील आकडे आणि निकाल लागल्यानंतर विशिष्ट मतदान केंद्रांवर झालेले मतदान तंतोतंत कसे जुळले? असा गंभीर प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
Discussion about this post