भुसावळ । वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरीमधून ५ रायफली चोरी गेल्याने खळबळ उडाली होती. काही दिवसापूर्वी यातील तीन रायफली रेल्वे रुळावर मिळवून आल्या होत्या. आता दहशतवादविरोधी पथकाने गुन्ह्याचा उलगडा केला असून उर्वरित २ बंदुकांसह संशयित आरोपीला अटक केली आहे.
वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरी येथील शस्त्रागारातुन दि.१९ ऑक्टोबर ते दि.२१ ऑक्टोबर दरम्यान अज्ञात चोरट्यांनी वरणगांव शस्त्रागारातुन सील तोडुन तसेच कुलूप व कडी कोयंडा तोडुन शस्त्रागारातील ए.के.४७ बंदूक ३ व गलील ५.५६ चे २ या बंदुका चोरून नेले होते. त्यावरून वरणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्याने तसेच राष्ट्रीय सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातुन अति महत्वाचा असल्याने महाराष्ट्र राज्याचे दहशतवादविरोधी पथक तसेच ए.टी.एस.चा तांत्रीक विभाग यांना गुन्हा उघडकीस आणण्याच्या सुचना व मार्गदर्शन केले होते.
त्यानुसार ए.टी.एस.पथक हे दि.२३ ऑक्टोबरपासुन वरणगांव येथे ठाण मांडून बसले होते व गुन्हयाची बारकाईने व कसोशीने चौकशी करीत होते. त्यादरम्यान चोरी झालेल्या बंदुकापैकी दि.२८ ऑक्टोबर रोजी जाडगांव जवळील रेल्वे रूळावर ३ बंदुका बेवारस स्थितीत मिळुन आल्या होत्या. तसेच गुन्हयातील चोरी गेलेल्या दोन शस्त्र व आरोपी अदयापपावेतो मिळुन आलेले नव्हते. दि.०४ रोजी पोलीस रेकॉर्डवरील आरोपींची माहिती काढुन ए.टी.एस. पथकाने गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवुन, गुन्हा प्रकटीकरणाचे कौशल्य वापरून यातील संशयित आरोपी नामे लिलाधर उर्फ निलेश बळीराम थाटे (वय ४३ वर्षे, व्यवसाय शेती व प्लॉट खरेदी/विकी एजंट रा.तळवेल ता. भुसावळ) याचेकडे कसुन चौकशी केली.
सदर संशयित आरोपी याने गुन्हा केल्याचे कबुल केले. संशयीत आरोपीने ऑर्डनन्स फॅक्टरी, वरणगांव येथुन चोरीस गेलेले शस्त्र एके ४७ बंदूक आणि गलील रायफल हे पोलीसांकडे जमा केले. गुन्हयातील यापुर्वी बेवारस स्थितीत जाडगांव रेल्वे रूळावर मिळुन आलेल्या ३ रायफली हया देखील त्यानेच रेल्वे रूळावर टाकुन दिल्याचे कबुल केले आहे. गुन्हयातील संशयित आरोपी व गुन्हयात वापरलेली मोटर सायकल तसेच मोबाईल हे सहा.पोलीस निरीक्षक, वरणगांव पोलीस स्टेशन यांचेकडेस जमा केले असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास जळगांव जिल्हा पोलीस करीत आहेत.