मुंबई । राज्यातील शालेय शिक्षण विभागाने मोठा निर्णय घेत पहिलीच्या अभ्यासक्रमातून हिंदी विषय हटवण्याची घोषणा केली आहे. यानंतर सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या वेळापत्रकात कला, क्रीडा आणि कार्यानुभव या विषयांच्या तासांमध्ये वाढ करण्यात आली आहे.
दरम्यान शालेय शिक्षण मंत्र्यांनी पहिलीपासून हिंदी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला होता, परंतु या निर्णयाला राज्यभरातून मोठा विरोध झाला. अनेक राजकीय पक्ष, शिक्षण तज्ज्ञ, साहित्यक, सामाजिक कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकांनी हिंदी भाषेच्या सक्तीला विरोध दर्शवला. हा विरोध लक्षात घेता सरकारने आपला निर्णय मागे घेतला आहे. यानंतर आता पहिलीच्या वेळापत्रकातून हिंदी भाषा विषय वगळण्यात आली आहे. तसेच सुधारित वेळापत्रक देखील जाहीर करण्यात आले आहे.
पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा निर्णय मागे घेतल्यानंतर राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) अखेर सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. या नवीन वेळापत्रकातून हिंदी विषय पूर्णपणे काढून टाकण्यात आला आहे. त्यामुळे आता मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये केवळ या दोनच भाषा अनिवार्य असणार आहे. तसचे कला, क्रीडा आणि कार्यानुभव या विषयांसाठीच्या तासिकांचा कालावधी पूर्ववत करण्यात आला आहे.
विषयनिहाय तासिका विभागणी वेळापत्रक
एससीईआरटीने सर्व शाळांना लवकरात लवकर विषयनिहाय तासिका विभागणीनुसार वेळापत्रक तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. सुधारित वेळापत्रकात कला, क्रीडा, शारीरिक शिक्षण आणि कार्यानुभव या विषयांच्या तासिकांचा कालावधी कायम ठेवण्यात आला आहे. परंतु त्यांच्या साप्ताहिक तासिकांमध्ये वाढ करण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना या विषयांमध्ये अधिक वेळ देता येणार आहे.
Discussion about this post