जळगाव | महसूल व पोलीस प्रशासन वाळू तस्करांविरुद्ध आक्रमक झाली असून आज पहाटे वाळू वाहून नेणारे जवळपास १५० पेक्षा जास्त ट्रॅक्टर्स व डंपर्स जप्त केले. या कारवाईमुळे वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहे.
सध्या वाळू तस्करी मोठ्या प्रमाणात होत असून याच्या पुढे प्रशासन अक्षरश: हतबल झाल्याचे दिसून येत आहे. मात्र आयुष प्रसाद यांनी काही दिवसापूर्वीच जिल्ह्याचे जिल्हाधिकारी पदाचे सूत्रे हाती घेतली तेव्हा त्यांनी वाळू तस्करीला आळा घालणे ही आपली प्राथमिकता असेल असे सांगितले होते. यानुसार मध्यंतरी काही प्रमाणात कारवाई करण्यात आली होती. मात्र रात्रीपासून वाळू तस्करांच्या विरोधात मोठी मोहिम राबविण्यात आली आहे.
आज पहाटे दोन वाजेपासून नाशिक येथील महसूल खात्याचे पथक हे स्थानिक महसूल व पोलीस प्रशासनासह थेट गिरणा नदीच्या पात्रात उतरले. यासोबत हे पथक गिरणा पात्राला लागूनच असलेल्या बांभुरी गावात देखील दाखल झाले. या पथकाने नदीपात्रासह गावात उभे असलेले ट्रॅक्टर्स आणि डंपर्स जप्त केले. येथून जवळपास १०० पेक्षा जास्त वाहने जप्त करून नेल्याने एकच खळबळ उडाली आहे. तर, सकाळपासून देखील बांभोरी गावासह परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. या संदर्भात अद्याप प्रशासनातर्फे अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
Discussion about this post