बुलढाणा : वर्षभर शेतात राबत असलेल्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बळीराजा पोळा सण महाराष्ट्रभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. उद्या म्हणजे २२ ऑगस्ट रोजी हा पोळा सण साजरा केला जाणार असल्याने शेतकऱ्यांची त्या अनुषंगाने तयारी केली आहे. मात्र त्यापूर्वी जळगावशेजारील जिल्ह्यात पोळा सण साजरा करण्यावर निर्बंध घालण्यात आले. लंपीचा प्रादुर्भाव वाढला असल्याने बुलढाणा जिल्ह्यात पोळा सण साजरा करण्यावर निर्बंध घालण्यात आले असून त्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी यांनी काढले आहेत.
बुलढाणा जिल्ह्यात अनेक तालुक्यात जनावरांमध्ये लंपीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसत आहे. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी एक आदेश काढून पोळा सण हा सार्वजनिक ठिकाणी साजरा न करण्याचे आदेश पारित केले आहे. अर्थात वर्षातून एक दिवस बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सण साजरा करण्याची शेतकऱ्यांची तयारी झाली आहे. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशावर शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.
दरम्यान आज गुरुवार असल्याने खामगाव येथील गुरांच्या बाजारात मोठ्या प्रमाणात गुरे एकत्र आलेले आहेत. हे अधोरेखित करत शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावर आक्षेप घेतला आहे. यावर बोट ठेवत आम्ही पोळा साजरा करणारच! जिल्हाधिकाऱ्यांना गुरांच्या बाजारातील गुरे दिसत नाहीत का? फक्त हिंदूंच्या सणांना अडथळा का? असे सवाल करत शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या पोळा सार्वजनिक साजरा न करण्याच्या आदेशावर आक्षेप घेतला आहे. यामुळे आजच्या आदेशावर अनेक शेतकरी आक्रमक होत आम्ही पोळा साजरा करणारच अशा भूमिकेवर ठाम आहेत. यामुळे आता यावर बुलढाणा जिल्हाधिकारी काय भूमिका घेतात हे बघणं महत्त्वाचं आहे.















Discussion about this post