नंदुरबार । काळाच्या ओघात पीक पध्दतीमध्ये बदल होत आहे. आता विदेशात पिकवल्या जाणाऱ्या पालेभाज्या भारतात सुद्धा पिकवल्या जात आहेत. त्यातच लाल मुळ्याची शेती नंदुरबार तालुक्यातील कृषी विज्ञान केंद्रात प्रायोगिक तत्त्वावर करण्यात आली आहे. आपल्याकडे प्रामुख्याने पांढरा मुळा हा खाण्यासाठी वापरतो. मात्र, लाल मुळा हा फारच कमी लोकांनी पाहिला असेल. या लाल मुळ्याची लागवड अनेकांना आश्चर्यचकित करू शकते.
लाल मुळ्याची लागवडीसाठी डिसेंबर ते फेब्रुवारी हा महिना अतिशय योग्य मानला जातो. लागवडीसाठी निचरा होणारी जमिन उत्तम मानली जाते. जमिनीचा सामू ५ ते ७.५ च्या दरम्यान असावा लागतो. लाल मुळ्याची लागवड बियांची पेरणी करुन किंवा नर्सरीत रोपे वाढवूनही करता येते. पेरणीसाठी सुमारे ८ ते १० किलो बियाणे लागते. व्यावसायिक लागवडीसाठी रोपवाटिक वाढवलेल्या सुधारित वाणांची निवड करावी. पेरणीनंतर साधारण २० ते ४० दिवस लागतात. एकरी ५४ क्विंटलपर्यंतचे उत्पादन मिळू शकते.
भाजीपाल्याच्या लागवडीतून कमी काळात अधिकचे उत्पन्न हे सहज शक्य असल्याची माहिती नंदुरबार कृषी विज्ञान केंद्राचे कृषी तज्ञ डॉ वैभव गुरवे यांनी दिली आहे. लाल मुळ्याची ओळख फ्रेंच मुळा म्हणून आहे. जो उच्च श्रेणीची भाजी आहे. त्यात अधिक अँटिऑक्सिडेंट आणि अँटीकार्सिनोजेनिक गुणधर्म आहेत.
हे मुळे गडद लाल रंगाची असतात आणि पाने गडद हिरव्या रंगाची असतात. लाल रंगामुळे ते दिसायला सुंदर आहे. लाल मुळ्याच्या वापराने कोशिंबीर पौष्टिक असण्यासोबतच दिसायलाही चांगली होते.
बाजारात सामान्य मुळा १० ते २० रुपये किलोने भाव मिळतो. त्यातच हा लाल मुळा मात्र ८० ते १०० रुपये किलोपर्यंत विकला जात आहे. यामुळे लाल मुळ्याची शेती केल्यास तसेच या पिकाचे योग्य व्यवस्थापन केल्यास त्यातून चांगला नफा मिळवता येतो. शेतकऱ्यांनी लागवड केल्यास त्यांना सामान्य मुळ्यापेक्षा अधिक नफा मिळू शकतो.
Discussion about this post