भारतीय केंद्रीय बँक, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कोट्यवधी भारतीयांना मोठा दिलासा दिला. जगात टॅरिफ वॉर भडकलेले असतानाच आरबीआयने रेपो दरात कपातीची घोषणा केली. त्यामुळे कार, घराचा ईएमआय कमी होणार आहे. रेपो रेटमध्ये ०.२५ टक्क्यांनी कपात केली आहे. रेपो रेट आता ६ टक्के झाला आहे. त्यामुळे आता कर्जाचा हप्ता कमी होणार आहे. आज पतधोरण बैठकीत हा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी ही माहिती दिली आहे.
RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा काय म्हणाले
अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आणि महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी रेपो रेटमध्ये कपात करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितले. ते म्हणाले की, सध्याच्या जागतिक आर्थिक परिस्थितीचा विचार करता, बाजारात गुंतवणूक वाढवणे हा या कपातीमागील मुख्य उद्देश आहे. या निर्णयामुळे उद्योग क्षेत्राला दिलासा मिळेल. ग्राहकांसाठी कर्ज स्वस्त होऊन खरेदीला प्रोत्साहन मिळेल. सर्वसामान्य नागरिकांना याचा फायदा होईल, परंतु महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी आरबीआय पुढील काळातही सतर्क राहील. दरम्यान, रेपोट रेटमध्ये कपात केल्यानंतर बँका त्यांच्या कर्ज व्याजदरात लवकरच बदल करू शकतात, असे तज्ज्ञांचे मत आहे.
10 वेळा रेपो दर कायम
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) पतधोरण समितीची बैठक यापूर्वी 4 ते 6 डिसेंबर 2024 दरम्यान जैसलमेर येथे झाली होती. दरात कोणताही बदल न करण्याचा निर्णय 4 विरुद्ध 2 या मताने त्यावेळी घेण्यात आला होता. रिझर्व्ह बँकेने फेब्रुवारी 2023 पासून रेपो दरात कुठलाही बदल न करण्याचे धोरण आतापर्यंत कायम ठेवले होते. त्यानंतर संजय मल्होत्रा यांच्या हातात सूत्र येताच पहिल्यांदाच दिलासा मिळाला होता. त्यानंतर आज 9 एप्रिल 2025 रोजी दुसऱ्यांदा व्याज दर कपातीचा निर्णय जाहीर झाला.
Discussion about this post