मुंबई । भारतीय रिझर्व्ह बँकेने कर्जदारांना पुन्हा निराश केलं आहे. आरबीआयने आपले धोरण दर 6.50 टक्के कायम ठेवले आहेत. RBI मॉनेटरी पॉलिसी कमिटीच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी ही घोषणा केली आहे.
आरबीआय गव्हर्नर म्हणाले की, चलनविषयक धोरण समितीच्या सहा सदस्यांपैकी 5 सदस्यांनी रेपो दरात कपात न करण्याच्या बाजूने मतदान केले आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात रिटेल चलनवाढ RBI च्या सहिष्णुतेच्या 4 टक्क्यांच्या खाली असूनही, RBI ने रेपो दरात कोणताही बदल केलेला नाही.
आरबीआय गव्हर्नर म्हणाले की, “जागतिक तणाव हा महागाईचा सर्वात मोठा धोका आहे. अलीकडच्या काळात धातू आणि खाद्यपदार्थांच्या किमती वाढल्यामुळे किरकोळ चलनवाढीचा धोका कायम आहे. “ते म्हणाले, जुलै आणि ऑगस्टमध्ये कोर महागाई वाढली आहे आणि बेस इफेक्टमुळे किरकोळ महागाई दरात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. RBI गव्हर्नरने 2024-25 साठी किरकोळ महागाई दर 4.5 टक्के राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. चलनवाढीचा दर चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत ४.१ टक्के, तिसऱ्या तिमाहीत ४.८ टक्के आणि चौथ्या तिमाहीत ४.२ टक्के राहण्याची शक्यता आहे.
बँकिंग प्रकरणातील तज्ञ आणि व्हॉईस ऑफ बँकिंगचे संस्थापक अश्विनी राणा यांनी रेपो दरात कोणताही बदल न केल्यावर सांगितले की, रिझर्व्ह बँकेने 2024 मध्ये सलग पाचव्यांदा रेपो दरात कोणताही बदल केलेला नाही. चलनवाढीचा दर नियंत्रणात ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँकेचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र रिझर्व्ह बँकेच्या म्हणण्यानुसार अन्नधान्य चलनवाढ अजूनही लक्ष्यापेक्षा जास्त आहे. त्यामुळे रेपो दर 6.50 टक्के ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ते म्हणाले, रेपो दर कमी होण्याची वाट पाहणारे बँक ग्राहक निराश झाले आहेत. फेडरल रिझर्व्हने व्याजदरात कपात केल्यानंतर, रिझर्व्ह बँक रेपो दरातही बदल करेल आणि सणांपूर्वी महागड्या ईएमआय भरणाऱ्यांना भेटवस्तू देईल, असे वाटले होते. मात्र असे झालेले नाही.
Discussion about this post