रावेर (जळगाव) : रावेर तालुक्यातील रेबोंटा येथील ८० वर्षीय पार्वताबाई कोळी यांची त्यांच्या नातेवाईकांनीच आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आर्थिक नुकसान आणि न्याय न मिळाल्याने अखेर पार्वताबाईंनी जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेतली. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देताना त्यांना अश्रू अनावर झाले.
पार्वताबाईंनी सांगितले की, बामणोद येथे त्यांचे पिढीजात घर होते. मात्र उपजीविकेचे कोणतेही साधन नसल्याने त्यांनी ते घर विकले. घर विकून मिळालेल्या एक लाख रुपयांवर नातेवाईक आनंदा कोळी यांनी हक्क सांगितला व ती रक्कम लाटल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
एवढेच नव्हे तर पैसे मागितल्यावर मानसिक त्रास देत शिवीगाळ केली जात असल्याचेही त्यांनी सांगितले. या प्रकरणी स्थानिक पोलिसांकडे आणि जिल्हा पोलिसांकडे तक्रार करूनही न्याय मिळाला नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. अखेर त्यांनी थेट जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची भेट घेतली. त्यांच्या निवेदनाची गांभीर्याने दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभाग तसेच प्रांताधिकारी आणि पोलीस प्रशासनाला तातडीने कार्यवाहीचे आदेश दिले आहेत.
Discussion about this post