जळगाव । नरेंद्र मोदी यांचा आज सायंकाळी शपथविधी सोहळा पार पडणार आहे. यात काही खासदारांना मंत्रिपदाची शपथ दिली जाणार असून रावेरच्या खासदार रक्षा खडसे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार आहे. यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. दरम्यान केंद्रीय मंत्रिपदाची माळ गळ्यात पडल्यानंतर रक्षा खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माझ्या प्रवासात नाथाभाऊंचा मोठा वाटा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
रक्षा खडसे म्हणाल्या की, माझी राजकारणाची सुरुवातच एकनाथ खडसे यांच्यापासून झाली आहे. माझ्या राजकीय प्रवासात नाथाभाऊंचा मोठा वाटा आहे. माझ्या माहेरच्या लोकांचा राजकारणाशी कुठलाही संबंध नाही. सामाजिक कामाची आवड मला माझ्या वडिलांपासून मिळालेली आहे.
एका राजकीय घराण्यात मी सून म्हणून आले. नाथाभाऊ यांच्याकडून मला खूप काही शिकायला मिळाले. माझ्या आयुष्यातील बरीच परिस्थिती बदलत गेली. त्या परिस्थितीत नाथाभाऊंनी मला खूप साथ दिली आहे. तसेच पक्षाच्या नेत्यांसह सर्व जनतेने मला साथ दिली आहे. हा क्षण माझ्यासाठी अत्यंत मोठा आहे. इतकी मोठी संधी मला मिळत आहे, असे म्हणताना रक्षा खडसे भावूक झाल्याचे दिसून आले. मला कुठलीही अपेक्षा नाही. पक्ष जी जबाबदारी देईल ती जबाबदारी मी स्वीकारेल, असेही त्यांनी म्हटले आहे.















Discussion about this post