जळगाव । एकनाथ खडसे यांनी काही वर्षांपूर्वी भाजपातून राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. मात्र सून रक्षा खडसे या भाजपातच असून त्या रावेर लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. परंतु त्याही पक्षांतर करणार असल्याची चर्चा सुरु असून यावरून खासदार रक्षा खडसेंनी जाहीर नाराजी व्यक्त केली.
खासदार रक्षा खडसे म्हणाल्या की, खडसे आडनावामुळे आणि सगळी परिस्थिती पाहता माझ्यावर मी पक्षांतर करणार आहे असा आरोप केला जातो. परंतु मी याआधीही माझे मत भरपूरवेळा मांडले आहे. कुटुंब म्हणून आम्ही एकत्र असलो तरी त्यांचा पक्ष वेगळा आहे आणि माझा पक्ष वेगळा आहे. आज तुम्ही कुणावरची जबरदस्ती करू शकत नाही की तुम्ही कुठे असले पाहिजे. त्यांचे विचार त्या पक्षाशी जुळतात आणि माझे विचार या पक्षाशी जुळतात म्हणून मी इथं आहे. माझे व्यक्तिगत काम किंवा मी १० वर्षात रावेर लोकसभा मतदारसंघात केलेले काम, लोकांशी जनसंपर्क आहे. तुम्ही फक्त खडसे नावामुळे मला डावलण्याचा प्रयत्न करत असतील तर ते चुकीचे आहे असं त्यांनी सांगितले.
त्याचसोबत मी महिला म्हणून ज्या परिस्थितीत मी २०१४ ची निवडणूक लढली हे सर्व जगाला माहिती आहे. ती लपवण्यासारखी परिस्थिती नाही. मी कुठल्या परिस्थितीतून आले सर्वांना माहिती आहे. केवळ खडसेंची सून म्हणून माझी ओळख ठेवली नाही. माझे व्यक्तिगत कामही ग्राऊंड पातळीवर जाऊन करायचा प्रयत्न केला आहे. वैयक्तिक जनसंपर्क वाढवला आहे. रक्षा खडसे नाव लोकांमध्ये पोहचवण्याचा प्रयत्न केला आहे. आज महिला म्हणून ती कुटुंबाच्या पाठिंब्यावर आणि कुणीतरी तिच्या मागे उभे राहिले तर पुढे जाऊ शकते असं चित्र कुठेतरी बदलले पाहिजे असंही रक्षा खडसेंनी म्हटलं.
Discussion about this post