मुंबई । महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. राज्याच्या वैभवशाली इतिहासाचा वारसा जपत एसटीच्या ताफ्यात येणाऱ्या नव्या ५५ आसनी अत्याधुनिक बसेसचे नाव ‘राजमाता जिजाऊ’ ठेवण्यात आल्याची घोषणा राज्याचे परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केली.
नव्या ५५ आसनी अत्याधुनिक बस मार्चपासून टप्प्याटप्प्याने राज्यभर प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार असून, भगव्या आणि पांढऱ्या रंगसंगतीत सजलेल्या या बस महाराष्ट्राच्या परंपरेचे आणि अभिमानाचे जणू चालते-बोलते प्रतीक ठरणार असल्याचे सांगण्यात आले.
मंत्री सरनाईक म्हणाले की, ‘छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण महाराष्ट्राचे दैवत आहेत. त्यांच्या स्वराज्य संकल्पनेमागे उभी राहिलेली प्रेरणाशक्ती म्हणजे राजमाता जिजाऊ साहेब, त्या अर्थाने त्या हिंदवी स्वराज्याच्या जननी ठरतात, म्हणून त्यांच्या स्मरणार्थ एसटीच्या नवीन बसचे ‘राजमाता जिजाऊ’ असे नामकरण करण्यात आले आहे.
अर्थात, एसटीने यापूर्वी शिवनेरी, शिवशाही, शिवाई, यशवंती, हिरकणी अशा नावांनी बससेवांना यापूर्वी गौरविले आहे. आता त्या परंपरेत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. दरम्यान, एसटीच्या सध्याच्या बसची आसन क्षमता साधारण ४० प्रवासी इतकी असताना, नव्या बसमध्ये ५५ प्रवासी आरामात बसू शकतील. म्हणजेच गर्दीच्या मार्गांवर उभे राहणाऱ्या तब्बल १५ प्रवाशांना आता बसण्याची सोय उपलब्ध होणार आहे. त्यामुळे ही सेवा विशेषतः दोन शहरांदरम्यानच्या अतिगर्दीच्या मार्गांवर सुरू करण्याचा एसटीचा मानस असल्याचे मंत्री सरनाईक यांनी सांगितले.















Discussion about this post