मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या 78 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मेळाव्याला उपस्थिती लावली. या मेळाव्यात राज ठाकरेंनी संबोधित करताना मराठीच्या मुद्द्यावरुन सरकारवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवल्याचं पहायला मिळालं. तसेच राज ठाकरेंनी यावेळी महाराष्ट्रातला माणूस गुजरातमध्ये शेत जमीन का विकत घेऊ शकत नाही, त्या बद्दल सांगितलं.
एकदा तुमची भाषा संपली आणि जमीन गेली की जगाच्या पाठिवर तुम्हाला काहीच स्थान नाही” असं राज ठाकरे म्हणाले. “गुजरातमध्ये शेत जमिनीसंदर्भात गुजरात टेनेन्सी आणि अॅग्रीकल्चर कायद्यानुसार तुम्ही गुजरातचे रहिवासी नसाल किंवा अनिवासी भारतीय हे गुजरातमध्ये जमीन विकत घेऊ शकत नाहीत. म्हणजे तुम्ही उद्या गुजरातमध्ये जमीन विकत घेऊ शकत नाही. ज्या राज्यातून पंतप्रधान आणि गृहमंत्री येतात, त्या राज्यात कोणीही नागरिक जमीन विकत घेऊ शकत नाही. समजा तुम्हाला गुजरातमध्ये जमीन विकत घ्यायची असेल, तर फेमा नावाचा कायदा आहे, त्या अंतर्गत रिझर्व्ह बँकेची विशेष परवानगी घ्यावी लागते” असं राज ठाकरे म्हणाले.
हिंदी भाषेवरून त्यांनी सरकारवर हल्लाबोल केला. माझ्याकडे भुसे आले होते. हिंदीच्या प्रश्नावर बोलायला. मी म्हटलं गुजरातमध्ये आहे का हो हिंदी?. पंतप्रधान आणि गृहमंत्री दोघेही गुजरातचे आहेत. अमित शाह बोलले की, मी हिंदी भाषिक नाही. मी गुजराती आहे. देशाचा गृहमंत्री ठणकावून सांगतो की मी हिंदी भाषिक नाही, गुजराती आहे. मोदी पंतप्रधान झाल्यावर अनेक प्रकल्प गुजरातला गेले. डायमंड प्रकल्प गेला. प्रत्येक व्यक्तीला राज्याबद्दल प्रेम असतं. आम्ही बोलल्यावर संकुचित कसे होतो?” असा सवाल राज ठाकरे यांनी केला.
Discussion about this post