मुंबई । महाराष्ट्रात पहिलीपासूनच हिंदी ही भाषा अनिवार्य करण्यात आल्यामुळे या निर्णयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरेंनी विरोध दर्शवलाय. हिंदी ही काही राष्ट्रभाषा नाही. ती देशातील इतर भाषांसारखी एक राज्यभाषा आहे. ती महाराष्ट्रात का म्हणून पहिलीपासून शिकायची? असा सवाल करत राज ठाकरेंनी केंद्राला थेट इशारा दिलाय.
राज ठाकरेंनी सोशल मीडियावर पोस्ट करत राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा २०२४ ला विरोध केलाय. तसेच शालेय अभ्यासक्रमातील हिंदीची पुस्तकं दुकानांमध्ये विकू दिली जाणार नाहीत. शाळांना देखील ती पुस्तकं विद्यार्थ्यांना वाटू दिली जाणार नाहीत, याची नोंद शाळा प्रशासनाने घ्यावी, असा इशारा राज ठाकरेंनी दिलाय. सोशल मीडियाच्या एक्स या साईटवर त्यांनी याबाबत पोस्ट केलीय. महाराष्ट्रात हिंदीची सक्ती खपवून घेतली जाणार नाही असा इशारा राज ठाकरेंनी दिलाय. केंद्र सरकार सध्या सर्वत्र ‘हिंदीकरण’ करण्याचे प्रयत्न करत आहे. हिंदीकरणाचे हे प्रयत्न राज्यात यशस्वी होऊ देणार नाहीत. असंही म्हटलं आहे
..तर संघर्ष अटळ
सोशल मीडिया पोस्टमधून केंद्राला इशारा देताना राज ठाकरे म्हणाले आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही आहोत ! महाराष्ट्रावर हिंदीकरणाचा मुलामा द्यायचा प्रयत्न कराल तर महाराष्ट्रात संघर्ष अटळ आहे. सरकार हा संघर्ष मुद्दामून घडवत आहे. तर येणाऱ्या आगामी निवडणुकांमध्ये मराठीविरुद्ध मराठीत्तर असा संघर्ष घडवून सरकर स्वतःचा फायदा करून घेण्याचा प्रयत्न करत आहे, त्यामुळेच हा सगळा अट्टाहास सुरु आहे का ? असा सवालही राज ठाकरेंनी उपस्थिती केला.
Discussion about this post