मुंबई । मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाला मराठी शिकले पाहिजे असे नाही, असे वादग्रस्त विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते भैय्याजी जोशी यांनी केलं आहे. जोशी यांनी केलेल्या या विधानाने राजकीय वर्तुळात संतापाची लाट उसळली असून पुन्हा एकदा मराठीचा मुद्दा चर्चेत आला आहे. यावरुनच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भैय्याजी जोशी यांना खडेबोल सुनावले आहेत.
काय म्हणाले राज ठाकरे?
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी मुंबईत राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी येणं गरजेचे नाही, असे विधान केल्याचे ऐकले. देशाची झालेली भाषावार प्रांत रचना, त्यात मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा म्हणून १०६ हुतात्म्यांनी दिलेले बलिदान या सगळ्याबद्दल भय्याजी जोशींना माहीत नसेल असे अजिबात नाही. पण कायम महाराष्ट्राबद्दलच किंवा मराठीबद्दलची अशी विधाने करायची याचं कारण काय ? असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे.
तसेच भय्याजी जोशींनी असेच विधान बेंगळुरू किंवा चेन्नईत करून दाखवावे…. आणि भय्याजी जोशींच्या या विधानाशी महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्ष सहमत आहे का ? उद्या समजा संघाच्या सोडाच इतर कुठल्याही जबाबदार व्यक्तीने असे विधान जर इतर राज्यात केलं असते तर त्या राज्यातील सर्व पक्षांनी निषेध नोंदवला असता… भारतीय जनता पक्ष महाराष्ट्राच्या अस्मितेला प्राधान्य देऊन निषेध नोंदवणार आहे का? असाही सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे.
सध्या MMR रिजनमधे चाललेला विकास आणि त्यामागील राजकीय हेतू हे जोशींच्या वक्तव्यातून सुरवात होताना दिसत आहेत. हे काय चाललय हे न समजण्या इतकी मराठी जनता दुधखुळी नाही हे जोशींनी लक्षात घ्यावे ! हे राजकारण करताना आपण स्वतः मराठी आहोत याचे भान पण जोशींनी सोडावे ? आत्ताच कोल्डप्ले नावाचा वाद्यवृंद मुंबईत येऊन गेला , त्याचे मुख्य गायक ख्रिस मार्टिन हे देखील इथे येउन मराठीत बोलून गेले.
त्या ब्रिटिश माणसालाही मुंबईत कोणती भाषा चालते आणि ही मुंबई कोणाची आहे हे समजते तर मग जोशी बुवांना हे समजू नये? या असल्या काड्या घालून ( अर्थात राजकीय हेतू असल्या शिवाय हे होणे नाही ) नवा संघर्ष आपण उदयाला आणत आहात हे जरूर ध्यानात ठेवावे ! बाकी सविस्तर 30 तारखेला गुढीपाडव्याला बोलूच! महाराष्ट्र नवनिर्माण सेना या विधानाचा निषेध नोंदवत आहे आणि मराठी माणूस हे वाक्य विसरणार नाही हे जोशीबुवांनी लक्षात ठेवावं! असा इशारा राज ठाकरेंनी दिला आहे.
Discussion about this post