मुंबई । महाराष्ट्र्रात सध्या ओबीसी- मराठा आरक्षणावरून राजकारण पेटलं असून याच मुद्द्यावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संताप व्यक्त करत राज्यकर्त्यांना खडेबोल सुनावले.
राज्यात जातीयवादी वातावरण आहे, मराठवाड्यात जास्त जातीयदवादी परिस्थिती आहे, या प्रश्नावर राज ठाकरे म्हणाले की, “मूळात हा विषय शिक्षणाचा, नोकरीचा आहे. महाराष्ट्रात भूमिपुत्रांना नोकऱ्या, चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे. यात जात येते कुठे? मग, तो ओबीसी असो किंवा मराठा. कुठल्याही जातीचा असो, महाराष्ट्रात मुला-मुलींना चांगलं शिक्षण, रोजगार मिळाला पाहिजे”
“राज्यात सगळ्या गोष्टी इतक्या मुबलक प्रमाणामध्ये आहेत की या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची गरजच नाही. मराठा ओबीसी वाद हे मताचे राजकारण आहे. लहान लहान मुळे आरक्षणामुळे आमची मैत्री तुटली असं सांगतात, हे चित्र भीषण आहे, महाराष्ट्रात असे चित्र कधीच नव्हते,” असे राज ठाकरे यावेळी म्हणाले.
दरम्यान,आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेने मोर्चेबांधणी सुरू केली असून राज ठाकरे हे स्वतः महाराष्ट्र दौरा करत आहेत. आज सोलापूर दौऱ्यादरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राज्यातील ओबीसी- मराठा आरक्षणाच्या संघर्षावर प्रतिक्रिया दिली. तसेच यावेळी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावर टीका केलीय.
काही दिवसांपूर्वीच शरद पवार यांनी महाराष्ट्रामध्ये मणिपूरसारखी परिस्थिती होण्याची भिती व्यक्त केली होती. यावरुनही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जोरदार टीका केली. शरद पवारांनी महाराष्ट्राचा मणिपूर करण्यात हातभार लावू नये, महाराष्ट्राचा मणिपूर होऊ नये म्हणून काळजी घ्यावी असा टोला त्यांनी लगावला.
Discussion about this post