जळगाव । राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल होत असून कुठं ढगाळ वातावरण जाणवत आहे, तर कुठं उन्हाचा तडाखा अधिक तीव्र होत असल्याचे चित्र आहे. याच दरम्यान आता राज्यातील वातावरणात पुन्हा एकदा बदल होणार आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे आज देखील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याला हवामान खात्याकडून येलो अलर्ट दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हवामान विभागाने कोकणात सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडणार असल्याचा इशारा दिला आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे ३० मार्च ते १ एप्रिल पर्यंत अवकाळी पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्यासोबतच ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज कोकण, पालघर, ठाणे, सिंधुदुर्गमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, नाशिक, अहिल्यानगर, सातारा, सांगली कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये देखील वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता आहे. या सर्व जिल्ह्यांना हवामान खात्याकडून येलो अलर्ट देण्यात आला आहे. उद्या म्हणजे १ एप्रिल रोजी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात गारपीट होण्याची शक्यता आहे.
उद्या कोणत्या जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट
तर उद्या म्हणजे 1 एप्रिल 2025 रोजी, ठाणे, रायगड, रत्नगिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम या जिल्ह्यांसाठी हवामान विभागने पावसाचा यलो अलर्ट जारी केली आहे.
Discussion about this post