मुंबई । मागील काही दिवसात राज्यात पावसाने धुमाकूळ घातला. सततच्या पावसाने खरीप पिके धोक्यात आल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला. दरम्यान राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर ओसरला आहे. असं असले तरी काही ठिकाणी हलक्या मध्यम सरी पाहायला मिळत आहेत. काही भागात पावसाची उघडीप असलेल्या भागात उन्हाचा चटका आणि उकाडा तापदायक ठरत आहे.
आज कोकण,घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच पूर्व विदर्भ, मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता असल्याने येलो अलर्ट देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात पावसाच्या उघडिपीसह हलक्या सरींची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
या जिल्ह्यांना अलर्ट
राज्यात आज रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा, अकोला, अमरावती, गडचिरोली जिल्ह्यांत जोरदार पावसाची, तर छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांत विजांसह पावसाचा अंदाज असल्याने हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे. तर उर्वरित राज्यात मुख्यतः पावसाच्या उघडिपीसह, हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली.
पुढील काही दिवस हवामानात अशीच चढ-उताराची स्थिती राहण्याची शक्यता असून, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे. दरम्यान गणपती विसर्जनाला पावसाचे सावट असेच कायम राहणार का हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरेल.















Discussion about this post