जळगाव/मुंबई । हवामान खात्याच्या माहितीनुसार राज्यात पुढील चार दिवस जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. त्यानुसार आज राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधारची शक्यता आहे. रायगड, पालघर, पुणे आणि सातारा या जिल्ह्यांसाठी पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. रत्नागिरी, कोल्हापूर, ठाणे, नाशिक, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर उत्तर महाराष्ट्रासह विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे.
पुणे हवामान विभागाचे शास्त्रज्ञ के. एस. होसाळीकर यांनी उपग्रह छायाचित्र जारी केले आहे. त्यात विदर्भाचा काही भाग वगळता संपूर्ण राज्यभरावर मान्सूनचे ढग जमा झाल्याचे दिसत आहे. त्यानुसार आगामी दोन, तीन दिवस कोकणात विशेषत: रायगड, सिंधूदुर्ग येथे जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यासोबतच पश्चिम मराठवाड्यातील काही भाग व मध्य महाराष्ट्रात मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर, मुंबई, ठाण्यात हलका ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
खानदेशातही सरी
गेल्या दोन दिवसांत खानदेशातील नाशिक, जळगाव, नंदुरबार जिल्ह्यांत पावसाच्या कमीअधिक पाऊस होता. तर धुळे जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यांत ढगाळ वातावरणाची स्थिती कायम असली तरी तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडला. अनेक ठिकाणी पावसाचा शिडकावा झाल्याने वाढीच्या अवस्थेत असलेल्या पिकांना दिलासा मिळाला आहे.
Discussion about this post