पुणे । राज्यातील ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाने विश्रांती घेतल्याने शेतकरी चिंतेत आहे. मात्र अशातच शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी आहे. राज्यातून गायब झालेला पाऊस पुन्हा परतणार आहे. सध्या बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे आज पूर्व विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. येत्या २५ ऑगस्टपर्यंत राज्याच्या विविध भागात पाऊस पुर्णपणे सक्रिय होईल.. असे हवामान खात्याकडून सांगण्यात येत आहे.
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि नागपूर या पाच जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज (19 ऑगस्ट) सकाळी आठ वाजेपर्यंत पूर्व विदर्भात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
तसेच जळगाव जिल्ह्यात पावसाने उघडीप दिल्यानंतर पावसाने हजेरी लावली. शुक्रवारी दिवसभर पावसाची रिमझिम सुरु होती. यामुळे पिकांना मोठा आधार मिळाला आहे. आज शनिवारी देखील जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे.
दरम्यान, यंदा राज्यात अद्यापही म्हणावा तसा पाऊस पडलेला नाही. राज्यातील अनेक भागांत पाऊसाच्या सरी कोसळला असला तरी अद्याप काही भाग लहानलेलाच आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याने बळीराजा चिंतेत आहे. पावसाने दडी मारल्यामुळे खरीप हंगामही धोक्यात आहे. आगामी काळात पाऊस न पडल्यास अनेक भागांमध्ये पाणी टंचाईचीही शक्यता वर्तवली जात आहे.
Discussion about this post