मुंबई । गत सप्टेंबर महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली होती. तर अतिपावसामुळे शेती पिकांचं अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला. मागच्या काही दिवसापासून राज्यात पावसाने उसंत घेतल्यामुळे बहुतांश भागात ‘ऑक्टोबर हीट’ जाणवत आहे. अशातच आता महाराष्ट्रात पावसाला पोषक हवामान असून, आज मराठवाडा आणि विदर्भात विजांसह पावसाची शक्यता असल्याने हवामान खात्याने येलो अलर्ट दिला आहे. उर्वरित राज्यात उन्हाचा चटका कायम राहून, मोजक्या ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
अरबी समुद्रात समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर, तसेच बंगालच्या उपसागरात तमिळनाडूच्या किनाऱ्यालगत समुद्र सपाटीपासून १.५ ते ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. राज्यात विजांसह पावसाला पोषक वातावरण निर्माण होत आहे.
काल म्हणजेच सोमवारी सकाळपर्यंत राज्यात अंशतः ढगाळ हवामानासह तीव्र ऊन आणि उकाडा कायम होता. बहुतांश ठिकाणी कमाल तापमानाचा पारा ३२ अंशांपार असून, दुपारच्या वेळी उन्हाची झळ अधिक तापदायक ठरली. रत्नागिरी येथे राज्यातील उच्चांकी ३५.४ अंश तापमानाची नोंद झाली आहे. सोलापूर आणि सांताक्रुझ येथे ३४ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली.
महाराष्ट्रात पावसाला पोषक हवामान तयार होत असून, आज सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांत पावसाची शक्यता असल्याने येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने वर्तविली आहे.















Discussion about this post