जळगाव । राज्यातील काही जिल्ह्यात २६ डिसेंबरपासून पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. विदर्भासह मध्य महाराष्ट्रात हा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा आहे. तर मध्य महाराष्ट्र २६ ते २८ डिसेंबरमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. हा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
उत्तर भारताकडून थंड वारे अन् दक्षिणेतून येणारे बाष्पयुक्त वारे यांची टक्कर राज्यावर होत आहे. त्यामुळे वरच्या थरांत झोतवारा (जेट स्ट्रीम विंड) वेगाने वाहत आहे. हे वारे वातावरणाच्या खालच्या थरांतही येत असल्याने राज्यात बोचरे वारे, दाट धुके अन् पावसाचे वातावरण तयार झाले असून बुधवारपासून चार दिवस काही भागांत पावसाच्या सरींचा अंदाज आहे. एकीकडे थंडीचा कडाका वाढलाय, त्यात पाऊस होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होणार आहे.
महाराष्ट्रात मात्र उत्तर व दक्षिण भागातून येणार्या वार्यांची टक्कर होत असल्याने विचित्र वातावरण तयार झाले आहे. तापमानात वाढ होऊनही वरच्या थरातील वारे, दाट धुके अन् पाऊस असे वातावरण 25 ते 29 पर्यंत राहण्याची शक्यता आहे. सध्या धुळे, नंदूरबार आणि नाशिक या जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ढगाळ वातावरणामुळे राज्यात इतर भागातही पाऊस वाढण्याचा अंदाज आहे.
Discussion about this post