गेल्या चार दिवसांपासून महाराष्ट्रातील विविध भागांत मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाने (IMD) 23 मे 2025 रोजी दिला आहे.
विशेषतः कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये 30 ते 40 किमी प्रतितास वेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्यांसह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र आणखी तीव्र होऊन उत्तरेकडे सरकत असल्याने पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पुढील 2-4 दिवस मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा तसेच नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून, ते पुढील 36 तासांत तीव्र होऊन उत्तरेकडे सरकणार आहे. यामुळे कोकण किनारपट्टीवर जोरदार पाऊस पडेल. रायगड आणि रत्नागिरीसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, नगर, संभाजीनगर, नाशिक आणि सिंधुदुर्ग यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
वाऱ्याचा वेग 35-40 किमी प्रतितास आणि काही ठिकाणी 60 किमी प्रतितासपर्यंत जाण्याची शक्यता आहे. मेघगर्जनेसह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
पुढील चार दिवसांचे अलर्ट –
हवामान विभागाने (IMD) पुढील चार दिवसांसाठी राज्यात जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. आज (23 मे) रायगड आणि रत्नागिरीला रेड अलर्ट, तर मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, नगर, संभाजीनगर, नाशिक आणि सिंधुदुर्ग यांना ऑरेंज अलर्ट आहे. उर्वरित भागांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. शनिवार आणि रविवारी (24-25 मे) कोकण किनारपट्टीवर ऑरेंज अलर्ट, तर उर्वरित राज्यात यलो अलर्ट कायम राहील.
कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा धुमाकूळ
कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पुढील तीन-चार दिवस पाऊस धुमाकूळ घालणार आहे. ठाण्यात आजपासून, तर मुंबई आणि पालघरमध्ये उद्यापासून अतिवृष्टीला सुरुवात होईल.
रायगड आणि रत्नागिरीत 25 मेपर्यंत पावसाचा जोर कायम राहील, तर सिंधुदुर्गात सलग पाच दिवस अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. पुणे, सातारा, अहिल्यानगर आणि कोल्हापूरच्या घाट परिसरात दोन दिवस ऑरेंज अलर्ट आहे. मराठवाड्यात परभणी, बीड, नांदेड आणि लातूर येथे आज, तर छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्या मुसळधार पावसासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Discussion about this post