जळगाव/मुंबई । राज्यातील वाढत्या तापमानामुळे नागरिक हैराण झाले असतानाच हवामानात आणखी बदल होण्याचे संकेत मिळत आहेत. पुढील काही दिवसांत राज्यातील अनेक भागांत मेघगर्जनेसह पाऊस, विजांचा कडकडाट आणि वादळी वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. विशेष जळगावमध्ये पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून जाणवत असलेल्या उष्णतेच्या लाटेपासून काहीसा दिलासा मिळाला असून गुरुवारी कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. मात्र रात्रीच्या तापमानातही वाढ झाल्याने उकाड्याचा त्रास कायम असल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे.
हवामान तज्ज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांच्या माहितीनुसार १३ ते १६ मार्चदरम्यान मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. या काळात विजांचा कडकडाट होऊन वादळी वारे वाहण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. तर १३ आणि १४ मार्चदरम्यान उत्तर कोकणातील काही भागांत उष्णतेच्या लाटेसदृश परिस्थिती कायम राहू शकते.
दरम्यान, १३ ते १७ मार्चदरम्यान मुंबई आणि कोकण वगळता राज्यातील इतर भागांत ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे. १५ आणि १६ मार्च रोजी विदर्भ, मराठवाडा तसेच धुळे, जळगाव, नाशिक, पुणे, अहिल्यानगर, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांत काही ठिकाणी गडगडाटासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
तसेच १४ मार्चपर्यंत अलिबाग, डहाणू, जळगाव, नाशिक, अकोला, अमरावती आणि बुलढाणा या भागांत उष्णतेच्या लाटेसदृश स्थिती जाणवण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली आहे. बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन तज्ज्ञांकडून करण्यात आले आहे.















Discussion about this post