मुंबई: संपूर्ण जून महिना प्रतीक्षा केल्यानंतर अखेर शनिवारी मुंबईमध्ये पावसाचे आगमन झाले. शहरासह उपनगरांमध्ये आनंदधारा बरसल्याने मृद्गंधाने मुंबईकर सुखावले. तसेच राज्यातील इतर ठिकाणी देखील पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, राज्यातील काही जिल्ह्यांना पुढील ४ दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर अलर्ट जारी करण्यात आला आहे.
जळगाव जिल्ह्यातील शेतकरी पाऊस कधी पडणार याची आतुरतेने वाट पाहत आहे. त्यात जळगाव जिल्ह्यात २६ जूनपासून मुसळधार पावसाचा इशारा वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपणार आहे.
या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा
मेप्रमाणे जाणवणारा असह्य उकाडा, उन्हाचे चटके हे वातावरण अवघ्या एका रात्रीत बदलले. दक्षिण कोकणात शुक्रवारी मान्सून सक्रीय झाल्यानंतर शनिवारी कोकणातील मान्सूनरेषा अलिबागपर्यंत पुढे सरकल्याचे भारतीय हवामान विभागाने जाहीर केले. मान्सून सक्रीय झाल्यानंतर पहिल्याच दिवशी मुंबईमध्ये पावसाने दमदार उपस्थिती लावली. भारतीय हवामान विभागाने मुंबईतही रविवारसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला. रायगड जिल्ह्यामध्ये पुढील चार दिवसांसाठी आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पुढील दोन दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
Discussion about this post