जळगाव । राज्यात उन्हाचा कडाका कायम असून राज्यातील काही भागात गेल्या दोन दिवसापासून ढगाळ हवामान दिसत आहे. अशामध्ये हवामान खात्याने राज्यातील काही भागात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविला आहे. हवामान विभागाने उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात उद्या बुधवारपासून पावसाचा अंदाज दिला आहे. विशेष जळगाव जिल्ह्यात देखील उद्या १९ रोजी पावसाचा अंदाज वर्तविला आहे. यामुळे शेतकऱ्यांचं टेन्शन वाढणार आहे.
जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ होत होती, यामुळे उन्हाचा तडाखा वाढत जात होता. रविवारी मात्र अचानक वातावरणात बदल होऊन जळगावमध्ये काही अंशी ढगाळ वातावरण पाहायला मिळाले. त्यातच जिल्ह्यात वाहत असलेल्या वेगवान वाऱ्यांमुळे तापमानात काही प्रमाणात घट झालेली पाहायला मिळाली. सोमवारी जळगावचे दिवसाचे तापमान ३८ अंशावर आले होते. तर रात्रीचे तापमान २० अंशावर असल्याने मात्र सध्या उकाडा जाणवत आहे. आजपासून पुढील चार दिवस तापमानात घट दिसून येईल मात्र २३ मार्चनंतर जिल्ह्यात तापमानात वाढ होण्याचा अंदाज आहे.
दरम्यान उद्या जळगावसह राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तविला आहे. बुधवारी धुळे, नंदूरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि विदर्भातील काही भागात पावसाची शक्यता आहे. चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली आणि यवतमाळ येथे विजांसह पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. वाऱ्याचा वेग ३० ते ४० किमी प्रतितास राहू शकतो. परभणी, हिंगोली, नांदेड, भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्यात हलक्या पावसाचा अंदाज आहे. राज्यातील काही भागात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
Discussion about this post