मुंबई । देशभरात मान्सूनने जोर धरला असून, चक्रीवादळाच्या प्रभावामुळे महाराष्ट्रासह 24 राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवला आहे. दक्षिण, पश्चिम, मध्य आणि पूर्व भारतात 17 ते 22 जूनदरम्यान जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर भारतात उष्णतेच्या लाटेनंतर पावसामुळे दिलासा मिळेल, तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आले आहेत.
बंगालच्या उपसागरात समुद्रसपाटीपासून 3.1 ते 7.6 किमी उंचीवर चक्रीवादळाची हालचाल दिसून येत आहे. यामुळे दक्षिण-पश्चिम मान्सून आणखी सक्रिय होण्याची शक्यता आहे. पुढील 24 तासांत मान्सून ओडिशा, विदर्भ आणि छत्तीसगडमध्ये पुढे सरकेल, तर 19 जूनपर्यंत पावसाचा जोर कायम राहील. तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, गोवा, गुजरात आणि मध्य प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल यांसह अनेक राज्यांत तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा आहे.
महाराष्ट्रात रेड, ऑरेंज अलर्ट
महाराष्ट्रात मान्सूनने जोर पकडला असून, कोकणातील रायगड, रत्नागिरीसाठी रेड अलर्ट, तर मुंबई, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग आणि पुणे, सातारा, कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट जारी झाला आहे. अरबी समुद्रावरील चक्रीवादळ आणि मराठवाड्यातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पुढील 48 तासांत कोकण, मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा धोका आहे. यामुळे खरीप पिकांच्या पेरणीला गती मिळाली असली, तरी अतिपावसामुळे नुकसानाची भीती आहे. मुंबई, पुणे आणि कोकणात जनजीवन विस्कळीत झाले असून, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क आहे.
पावसाचा जोर कुठे?
कोकण, मध्य महाराष्ट्र: रेड आणि ऑरेंज अलर्ट, अतिमुसळधार पाऊस.
विदर्भ, मराठवाडा: मान्सून पुढे सरकण्याची शक्यता, मुसळधार पाऊस.
उत्तर भारत: उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशात तीन दिवस जोरदार पाऊस.
पूर्व, मध्य भारत: मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, बिहारमध्ये वादळी पावसाचा अंदाज.
दरम्यान, हवामान विभागाने शेतकरी आणि नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, पूर आणि भूस्खलनाचा धोका लक्षात घेऊन प्रशासनाने तयारी केली आहे.
Discussion about this post