जळगाव । राज्यातील कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार सुरूच आहे. पहाटे धुके, त्यानंतर दिवसभर ढगाळ वातावरण अनुभवायला मिळत आहे. धुक्याची चादरही पसरलेली पाहायला मिळत आहे. अशातच येत्या दोन ते तीन दिवसांत महाराष्ट्रात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल, असं हवामान खात्याने सांगितलं आहे. जळगावातही पावसाचा अंदाज वर्तविण्यात आल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
कोकणात सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी येथे दोन दिवस पावसाचा अंदाज आहे, तर रायगडमध्ये रविवारी हलका पाऊस पडू शकतो. उत्तर मध्य भारतात धुळे, नंदुरबार येथेही तीन दिवस हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी, शनिवारी मेघगर्जनेसह पाऊस पडेल अशी माहिती प्रादेशिक हवामान विभागाने दिली. यासोबतच सातारा, सांगली, सोलापूर, बीड, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, गोंदिया, नागपूर येथे शुक्रवारी तुरळक पाऊस पडू शकतो.















Discussion about this post