नंदुरबार : शहादा येथील खेतिया रस्त्यावरील मलोणी शिवारात विनापरवाना आयुर्वेदिक औषधांची निर्मिती करणाऱ्या कारखान्यावर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने छापा टाकून साडेसहा लाख रुपये किमतीचा कच्चा व पक्का माल तसेच औषध निर्मितीसाठी आवश्यक असलेले साहित्य जप्त केले. याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
शहादा खेतिया रस्त्यावरील एका इमारतीच्या पाठीमागे पत्र्याच्या शेडमध्ये औषधांची निर्मिती होत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर अन्न व औषध प्रशासन विभागाचे नाशिक येथील सहाय्यक आयुक्त संदीप देवरे, धुळे येथील औषध निरीक्षक किशोर देशमुख, सहायक मंगेश भावसार नंदुरबार येथील सौरभ देवकर यांच्या पथकाने छापा टाकला.
सदर ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आयुर्वेदिक औषधांची निर्मिती करण्यात येत असल्याचे आढळून आले. या फॅक्टरीमध्ये तायके हेल्थकेअर नामक कंपनी मार्फत चवनप्राश व इतर शक्तीवर्धक आयुर्वेदिक हेल्थकेअर उत्पादनांची निर्मिती पुणे येथील एका कंपनीमार्फत केली जात होती. त्यानंतर तयार केलेले उत्पादन पुणे येथे रवाना करत ते देशभर विक्री केली जात होती.
कारखान्यातील साहित्याला सील
दरम्यान कारवाईत पथकातील अधिकाऱ्यांनी औषध निर्मितीचा परवाना व इतर आवश्यक राज्य शासनाकडून मिळालेल्या परवाना तसेच कागदपत्रांची मागणी केली. मात्र, संबंधितांकडे हि कागदपत्र नव्हती. यामुळे विनापरवाना औषधाची निर्मिती केली जात असण्यावर फॅक्टरीतील साहित्याची तसेच कच्चा व पक्का मालासह औषध निर्मीतीसाठी असलेले साहित्य सील करण्यात आले आहे. या कार्यवाहीत ६ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
Discussion about this post