जळगाव । जळगाव वैद्यकिय महाविद्यालयाच्या पॅथोलॉजी विभागावर छापेमारी करण्यात आली असून यादरम्यान, एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यावेळी रुग्णालयात रुग्णांच्या गाठींची तपासणीसाठी वापरण्यात येणारे किट मुदतबाह्य असल्याचे उघड झाले आहे.
अपर जिल्हाधिकारी अर्पित चव्हाण व अन्न, औषध प्रशासनाने शनिवारी महाविद्यालयाच्या पॅथोलॉजी विभागात जाऊन तपासणी केली असता हा प्रकार उघड झाला आहे. २०० स्लाईड असलेले किट जप्त करण्यात आले आहे. या किटचा वापर रुग्णांसाठी होत नसल्याचा दावा ‘जीएमसी’ने केला आहे.
शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाच्या पॅथोलॉजी विभागात रुग्णांच्या शरीरावरिल विविध गाठींची तपासणी केली जाते. त्यासाठी वापरण्यात येत असलेल्या किटचा मुदत जुलै २०२२ मध्येच संपुष्टात आलेली असल्याबाबतची तक्रार पियुष नरेंद्र पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. त्याची दखल घेत अप्पर जिल्हाधिकारी अर्पित चव्हाण, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त अनिल माणिकराव आणि इतर अधिकाऱ्यांनी महाविद्यालयाच्या पॅथॉलॉजी विभागात शनिवारी तपासणी केली. त्यात हा मुदतबाह्या साठा आढळून आला. पथकाने पंचनामा करुन हे किट जप्त केले.
बंद पाकिटात अहवाल दिला
या कारवाईच्या संदर्भात औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त अनिल माणिकराव यांच्याशी ‘लोकमत’ ने संपर्क साधला असता, आपल्याला कारवाईचे अधिकार नाहीत. चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार चौकशी करुन बंद पाकिटात अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला आहे. चौकशीत काय निष्पन्न झाले हे सांगण्यास त्यांनी नकार दिला.