नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा भारत जोडो यात्रा सुरू करण्यात आली असून ही यात्रा असाममध्ये पोहोचली आहे. पण असाममध्ये यात्रेला गालबोट लावण्याचा प्रयत्न झालाय. भाजपच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याच्या कारवर हल्ला केला आहे. तर राहुल गांधी यांचीही बस अडवली होती. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी तर त्यांच्या गाडीवर भाजपच्या लोकांना हल्ला केल्याचा दावा केला आहे. जयराम रमेश यांनी ट्विटरवरून एक पोस्ट आणि व्हिडीओ ट्विट करून त्यांच्या कारवर हल्ला झाल्याचा आरोप केला आहे. काही वेळापूर्वी सुनीतपूरच्या जुमुगुरीहाट येथे माझ्या गाडीवर भाजपच्या लोकांनी हल्ला केला. गाडीच्या विंडशील्डवर लावलेले भारत जोडो यात्रेचे स्टिकरही फाडण्यात आले. हल्ला करणाऱ्याने स्टिकरवर पाणी फेकले. भारत जोडो यात्रेच्या विरोधात घोषणा दिल्या. पण आम्ही संयम ठेवला. आम्ही गुंडांना माफ केलं. पण ते वेगाने आमच्या दिशेने आले. असामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांच्याकडूनच हे सर्व होत आहे, यात काहीच शंका नाही. पण आम्ही घाबरलेलो नाही. आम्ही संघर्ष करत राहू, असं जयराम रमेश यांनी म्हटलंय.
तुमचे गुंड यात्रा रोखू शकत नाही
जयराम रमेश यांच्या कारवर झालेल्या हल्ल्याचा काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी निषेध नोंदवला आहे. आमचा ताफा असाममध्ये रॅलीच्या ठिकाणी चालला होता. तेव्हा जुमगुरीहाटमध्ये मुख्यमंत्री सरमा यांच्या गुंडांनी काँग्रेसच्या सोशल मीडिया टीमचे कॅमेरामन आणि इतर सदस्यांवर हल्ला केला. त्यात दोन महिलांचा समावेश होता. या गुंडांनी जयराम रमेश यांच्या गाडीवरही हल्ला केला. त्यांच्या कारवरील स्टिकर फाडले. त्यावर पाणी फेकले, असं सांगतानाच मुख्यमंत्री महोदय, तुम्ही आमची यात्रा रोखू शकत नाही. तुमचे गुंड आमची यात्रा रोखू शकत नाही, असं सुप्रिया श्रीनेत यांनी म्हटलंय. तर काँग्रेस नेते केसी वेणुगोपाल यांनी या हल्ल्याचा निषेध नोंदवला आहे.
Discussion about this post