मुंबई । भाजप नेते आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांबाबत मोठा गौप्यस्फोट केला असून त्यामुळे महायुतीमधील वाद चव्हाट्यावर आला आहे. धाराशिव येथील एका शासकीय कार्यक्रमात साखर कारखानदारीच्या धोरणावर बोलताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी हा गौप्यस्फोट केला. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या या वक्तव्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चा होऊ लागली आहे.
नेमकं काय म्हणाले विखे पाटील?
जनाची नाही तर म्हणाची ठेवा असं म्हणत मंत्री विखे पाटील यांनी शरद पवारांवर टीका केली. तसेच साखर संघाच्या अहवालात पीएम नरेंद्र मोदी आणि अमित शहांचा फोटो अन् अभिनंदनाचा ठराव न घेतल्याने आपण अजित पवारांना खडेबोल सुनावल्याचा गौप्यस्फोट विखे पाटील यांनी केला आहे.
राधाकृष्ण विखे पाटील भाषण करताना म्हणाले की, ‘आज राज्याची सध्यस्थिती काय आहे. आज आपण पीएम मोदीसाहेब आणि अमित शहा यांचे अभिनंदन केले पाहिजे. या लोकांनी इथेनॉलचे धोरण आणले म्हणून आज आपले साखर कारखाने टिकून आहेत. आपल्या इथे काय झालं नुसत्या फाईल दिल्या. चला दिल्लीला. गेल्या वर्षी आमची मिटिंग होती साखर कारखाण्यासंदर्भात की कारखाने कधी सुरू करायचे. त्यावेळी साखर कारखाना संघ आणि मंत्रिमंडळात बैठक झाली. तेव्हा अजित पवार काही आपल्या मंत्रिमंडळात नव्हते.’
त्यांनी पुढे सांगितले की, ‘या बैठकीत मी अजित पवारांना एकच प्रश्न विचारला की आज कारखानदारी इथेनॉल धोरणामुळे टिकली की नाही? तर ते म्हणाले टिकली. मी म्हणालो कुणामुळे टिकली? ज्या आदरणीय प्रधानमंत्र्यांनी इथेनॉल धोरण आणले म्हणून टिकली त्यांचे फोटो तुमच्या वार्षिक अहवालामध्ये आहेत का? अभिनंदनाचा ठराव केला का? तर ते नाही म्हणाले. तेव्हा मी म्हणालो जनाची नाही तर मनाची ठेवा. ज्यांनी आपल्याला जीवदान दिले त्याची तरी आठवण ठेवा. ज्यांनी आपले वाटोळं केलं त्यांचे फोटो तुम्ही वापरून मोठे झाले.’ असे म्हणत विखे पाटील यांनी यावेळी शरद पवार यांच्यावर देखील टीका केली. विखे पाटील यांनी भरसभेत हा मोठा गौप्यस्फोट केल्यामुळे चर्चा होऊ लागली आहे.
Discussion about this post