जळगाव । राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतक-यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतक-यांना, मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती, मनोबल यामध्ये वाढ होऊन आणखी उमेदीने नवनवीन अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषि उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतक-यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परीसरातील इतर शेतक-यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, या उद्देशाने दरवर्षी राज्यांतर्गत पीकस्पर्धा योजना राबविण्यात येते.
यावर्षी देखील कृषी विभागामार्फत रब्बी हंगाम सन २०२४ मध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवस या ५ पिकांसाठी पिकस्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
पीक स्पर्धेसाठी रब्बी पीके ज्वारी, गहू, हरभरा,करडई व जवस अशा एकूण 05 पिकांचा सामावेश असणार आहे. स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वत:च्या नावे जमीन असून ती जमीन स्वत: कसत असणे आवश्यक आहे. शेतकऱ्याला एकापेक्षा जास्त पिकासाठी पिकासाठी अर्ज करता येणार आहे. पिकस्पर्धेमध्ये सहभागी लाभार्थीचे स्वतःच्या शेतावर त्यापीकाखाली किमान 40 आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक असणार आहे.
अर्ज करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांमध्ये विहित नमुन्यातील अर्ज (प्रपत्र-अ), ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरल्याचे चलन, ७/१२,८-अ चा उतारा, जात प्रमाणपत्र (आदिवासी असल्यास), पिकस्पर्धेसाठी शेतकऱ्याने संबंधित ७/१२ वरील घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित केलेला नकाशा देखील आवश्यक आहे. ३१ डिसेंबर पर्यंत शेतकऱ्यांना अर्ज भरता येणार आहे.
सर्वसाधारण गटासाठी पीकनिहाय (प्रत्येक पिकासाठी स्वतंत्र) रक्कम रु.300 तर व आदिवासी गटासाठी पीकनिहाय रक्कम रु. 150 राहील.
तालुकास्तर,जिल्हास्तर, व राज्यस्तरावरील पिकस्पर्धा निकाल – प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पिकस्पर्धा विजेते निवडण्यात येणार आहे. या स्पर्धेतील बक्षिसाचे स्वरुप हे पातळीनुसार असणार आहे. ज्यात तालुका पातळीवरील पहिले बक्षिस पाच हजार रुपये , दुसरे बक्षिस तीन हजार रुपये, तिसरे बक्षिस –दोन हजार रुपये असणार आहे. तर जिल्हा पातळी वरील पहिले बक्षिस हे दहा हजार रुपये, दुसरे बक्षिस – सात हजार रुपये, तिसरे बक्षिस – पाच हजार रुपये आहे. राज्य पातळीवरील पहिले बक्षिस – पन्नास हजार रुपये, दुसरे बक्षिस – चाळीस हजार रुपये, तिसरे बक्षिस – तीस हजार रुपये असणार आहे.
पिकांच्या क्षेत्रात आणि उत्पादनात वाढ व्हावी याकरिता जास्तीत जास्त शेतक-यांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे. असे आवाहन कृषि आयुक्तालयामार्फत करण्यात आल्याचे कृषी संचालक रफिक नाईकवाडी यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
Discussion about this post