जळगाव । जळगाव शहरातील आर.आर.शाळेत खेळत असताना नववीत शिकणाऱ्या बुलढाण्यातील विद्यार्थी कल्पेश वाल्मीक इंगळे (वय १४, रा. कठोरा, जि.बुलढाणा, ह.मु.कासमवाडी) या मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज शुक्रवारी घडली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कल्पेश हा आपल्या कुटुंबासह, म्हणजेच आई, वडील, लहान भाऊ आणि बहिणीसोबत राहत होता. शुक्रवार, ११ जुलै रोजी तो नेहमीप्रमाणे सकाळी शाळेत गेला होता. दुपारी ३ वाजेच्या सुमारास शाळेतील जेवणाच्या सुट्टीदरम्यान, तो इतर विद्यार्थ्यांसोबत खेळत असताना अचानक बेशुद्ध होऊन जमिनीवर पडला, असे शाळेतील शिक्षकांनी सांगितले.
शिक्षकांनी तातडीने त्याला जवळच्या खासगी रुग्णालयात नेले.खाजगी रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेने कल्पेशच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. दरम्यान, कल्पेशच्या आई-वडिलांनी संशय व्यक्त केला आहे की, त्याच्या मृत्यूमागे शाळेतील काही विद्यार्थ्यांशी झालेला वाद कारणीभूत असू शकतो. त्यांनी सांगितले की, दोन दिवसांपूर्वीही त्याचा काही विद्यार्थ्यांशी वाद झाला होता. त्यामुळे शाळेतील सीसीटीव्ही फुटेज तपासून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
Discussion about this post