पुणे । कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन हत्या केल्याचं प्रकरण ताजं असताना तसाच काहीसा प्रकार पुण्यात घडला आहे. पुण्यातील राजगुरूनगरमधून गायब झालेल्या २ चिमुकल्या बहिणींची हत्या झाल्याचे उघड झाले आहे. घराबाहेर खेळणाऱ्या या दोन्ही बहिणींचे अपहरण करण्यात आले होते. शेजारी रहाणाऱ्या आचाऱ्याने चिमुकल्यांवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. आपलं कृत्य बाहेर समजेल या भीतीने त्याने दोन्ही मुलींची हत्या केली असल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळ्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, राजगुरुनगर शहरातील वाडा रोड परिसरातील राहणाऱ्या मकवाने कुटुंबाच्या घराच्या वर एक आचारी राहायला होता. त्यानेच या बहिणींची हत्या केल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे. आधी या आचाऱ्याने दोन्ही बहिणींना गोड बोलून स्वतःच्या घरात आणले. तिथेच त्याने सुरुवातीला एका बहिणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला.
मात्र तिने विरोध केला आणि आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला. आता आपलं बिंग फुटेल या भीतीने त्याने एका बहिणीचा जीव घेतला. त्यानंतर दुसरी बहिणीचाही तसाच जीव घेतला. मृतदेहांची विल्हेवाट लावण्यासाठी घरालगतच्या इमारतीजवळील ड्रममध्ये मृतदेह ठेवले.
राजगुरूनगर पोलिसांकडे सुरुवातीला अपहरणाचा गुन्हा दाखल होता. या प्रकरणी आचाऱ्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. तर बहिणींचे मृतदेह शवविच्छेदन अहवालासाठी पुण्याच्या ससून रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. या अहवालातून नेमकं काय-काय घडलं हे स्पष्ट होईल.















Discussion about this post