जळगाव । प्रवाशांच्या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेनं पुणे–नागपूर मार्गावर विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई ते नागपूर, कोल्हापूर, सावंतवाडी आणि पुणे ते नागपूर या मार्गांवर एकूण 24 विशेष गाड्या धावणार असून, त्यापैकी पुणे–नागपूर–पुणे सुपरफास्ट विशेष गाडीच्या एकूण चार फेऱ्या फेब्रुवारी महिन्यात होणार आहेत. यामुळे भुसावळ-जळगावहुन पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, पुणे ते नागपूर विशेष गाडी (क्रमांक 01467) 13 आणि 20 फेब्रुवारी रोजी दुपारी 3.50 वाजता पुणे स्थानकावरून सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी 6.30 वाजता नागपूरला पोहोचेल. त्याचप्रमाणे नागपूर ते पुणे विशेष गाडी (क्रमांक 01468) 14 आणि 21 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 वाजता नागपूरहून निघून रात्री 11.30 वाजता पुण्यात दाखल होईल.
याशिवाय पुणे–नागपूर–पुणे सुपरफास्ट गाडीच्या आणखी दोन विशेष फेऱ्याही निश्चित करण्यात आल्या आहेत. पुणे ते नागपूर सुपरफास्ट गाडी (क्रमांक 01419) 18 फेब्रुवारी रोजी दुपारी 3.50 वाजता पुण्याहून सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी 6.30 वाजता नागपूरला पोहोचेल. तर नागपूर ते पुणे सुपरफास्ट गाडी (क्रमांक 01420) 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 वाजता नागपूरहून निघून त्याच दिवशी रात्री 11.30 वाजता पुण्यात येईल.
या विशेष गाड्यांमुळे सण-उत्सव, परीक्षा, कौटुंबिक कारणे तसेच व्यावसायिक कामांसाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठी सोय होणार आहे. सध्या पुणे–नागपूर मार्गावर प्रवाशांची गर्दी वाढलेली असून, आरक्षित तिकिटांची उपलब्धता कमी होत असल्याने विशेष गाड्यांची मागणी सातत्याने केली जात होती.
टॉप व्हिडीओज















Discussion about this post