पुणे । सध्या राज्यात पुणे हिट अँड रन प्रकरण पेटले आहे. पुण्यातील कल्याणीनगर भागात मद्यधुंद अवस्थेत असलेल्या अल्पवयीन मुलाने सुसाट कार चालवत दुचाकीस्वारांना दिलेल्या धडकेत एका तरुणासह, तरुणीचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर पोलिसांनी अल्पवयीन मुलाच्या हातात कार दिल्याप्रकरणी पुण्यातील बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे
मात्र या घटनेवरून नेत्यांसह सर्वसामान्य नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया समोर येत असून यातच या अपघातावर विधानसभेचे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. तसेच या प्रकरणाची न्यायिक चौकशी व्हावी, अशी मागणीही वडेट्टीवर यांनी केली आहे.
वडेट्टीवार यांनी आपल्या X अकाउंटवरून एक पोस्ट केली आहे. त्यात ते म्हणतात की, पुणे अपघातातील आरोपीची अल्कोहोल चाचणी निगेटिव्ह असल्याचा अहवाल पोलिसांनी दिला आहे. अल्पवयीन असलेला आरोपी दारू पित असल्याचे सीसीटिव्ही फुटेज असूनही हा अहवाल आल्याने पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
अल्पवयीन आरोपीला दारू कशी उपलब्ध झाली? रजिस्ट्रेशन नसलेली गाडी पुण्यातील रस्त्यावर कशी आली? नियम डावलून बार आणि पब सुरू होते का? होते तर त्यांच्यावर कारवाई का नाही? या प्रश्नांचा तपास न करता आरोपीला निर्दोष सिद्ध करण्यासाठी जणू पुणे पोलिसांचा तपास असल्याचे चित्र आहे, असे कळीचे प्रश्न वडेट्टीवार यांनी विचारले आहेत.
वडेट्टीवार यांनी आरोपी अल्पवयीन आहे हे माहीत असताना त्याच्या वडिलांना अटक करण्यात इतका वेळ का लागला? असा प्रश्न उपस्थित करत सदर घटनेची न्यायिक चौकशी व्हावी आणि या प्रकरणात पुणे पोलिसांची सुद्धा चौकशी व्हावी, अशी मागणी देखील केली आहे.
Discussion about this post