भुसावळ । पुण्याला रेल्वेने जाण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील नागरिकांना भुसावळ पुणे- हुतात्मा एक्स्प्रेस धावत होता. मात्र घाटातील व्यस्त मार्गाचे कारण देत ही गाडी गेल्या जानेवारीपासून बंद करण्यात आली. त्यामुळे जळगावसह उत्तर महाराष्ट्रातील प्रवासी, उद्योजक, विद्यार्थी, शेतकरी आदींचे हाल होत आहे. यातच रेल्वे प्रशासनाने ११०२५ व ११०२६ पुणे – भुसावळ हुतात्मा एक्स्प्रेसचा आता अमरावतीपर्यंत विस्तार केल्यामुळे प्रवाशांमध्ये संतप्त भावना आहे.
कारण, आधीच भुसावळातून पुण्यासाठी स्वतंत्र गाडीची मागणी आहे. ती मागणी पूर्ण करणे दूर उलट आहे ती गाडी अमरावतीपर्यंत करून भुसावळकरांच्या तोंडाला पाने पुसण्यात आली. ही गाडी भुसावळऐवजी अमरावतीहून सुटल्यास भुसावळातील प्रवाशांना जागा मिळणार नाही. एवढे होऊनही जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी मात्र मूग गिळून गप्प आहेत.
११०२५, ११०२६ पुणे – भुसावळ- पुणे ही दररोज धावणारी हुतात्मा एक्स्प्रेस आता भुसावळऐवजी अमरावती येथून सुटेल. भुसावळसह यावल, रावेर, मुक्ताईनगर, बोदवड, जामनेर, चोपडा आदी भागांतून पुणे येथे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त आहे. यामुळे भुसावळ स्थानकातून पुण्यासाठी स्वतंत्र गाडी असावी, अशी मागणी होती. त्यानुसार काही वर्षांपूर्वी मनमाड येथून सुटणारी हुतात्मा एक्स्प्रेस भुसावळ स्थानकावरून सुरू करण्यात आली. या गाडीचा प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद आहे. पण, कोरोना काळापासून ही गाडी बंद केली होती.