जळगाव । जळगाव शहरात आणखी एका देहविक्रीचा अड्डा उध्वस्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. शनिपेठ पोलिस ठाणे हद्दीमधील खेडी परिसरातील योगेश्वर नगरात भाड्याच्या घरात सुरू असलेल्या देहविक्रीच्या अड्ड्यावर छापा टाकून दोन महिलांची सुटका करण्यात आली. पिटा कायद्यानुसार महिला व तिचा भाऊ अशा दोघांविरुद्ध शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापुरे यांना योगेश्वर नगरातील एका खासगी क्लासच्या शेजारी तीन वर्षांपासून भावासोबत भाड्याच्या घरात राहणारी मूळची जामनेर येथील रहिवासी असलेली महिला अवैध देहविक्रीचा व्यवसाय चालवत असल्याची माहिती मिळाली. त्यावर छापा टाकण्याचे निश्चित झाल्यानंतर शनिपेठ पोलिस ठाण्याच्या निरीक्षक कावेरी कमलाकर यांना पथकासह हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. डीवायएसपी गणापुरे हे पथकासह खेडी परिसरात दाखल झाले.संबंधित अड्ड्यावर डमी ग्राहक पाठवण्यात आला. त्याला पंचासमक्ष १५०० रुपये देण्यात आले. त्याला आत गेल्यानंतर मोबाइलवर मिस कॉल देण्याची खूण करण्यास सांगण्यात आले. त्यानुसार डमी ग्राहक अड्ड्यावर गेला.
तोपर्यंत ज्या घरात व्यवसाय सुरू होता, त्याला सर्व बाजूने पोलिसांनी घेरले. डमी ग्राहकाचा मिसकॉल आल्यानंतर पोलिस घरात शिरले. त्यांना त्या ठिकाणी अवैध व्यवसाय चालवणारी महिला, तिचा भाऊ व दोन महिला आढळून आल्या. पोलिस कारवाईनंतर दोन्ही महिलांची आशादीप या शासकीय वसतिगृहात रवानगी करण्यात आली. अड्डा चालवणारी महिला व तिचा भाऊ यांच्या विरुद्ध शनिपेठ पोलिस ठाण्यात पिटा कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास शनिपेठ पोलिस करत आहेत. डीवायएसपी यांच्या नेतृत्वाखाली पोलिस हवालदार रवींद्र मोतीराया, कॉन्स्टेबल अवेश शेख, अमोल ठाकूर, प्रणय पवार, महिला पोलिस कर्मचारी स्मिता पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.















Discussion about this post