जळगाव | कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक म्हणून प्रा.योगेश पाटील यांनी गुरूवार दि. ६ जुलै रोजी प्रभारी संचालक प्रा. दीपक दलाल यांच्याकडून पदभार स्वीकारला.
विद्यापीठाने मे महिन्यात परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालकपदासाठी मुलाखती घेतल्या होत्या. त्यामधून प्रा. योगेश पाटील यांची संचालकपदी निवड करण्यात आली. प्रा. पाटील हे लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठातंर्गत इंस्टिट्युट ऑफ पेट्रोकेमिकल्स इंजिनिअरींग येथे अधिव्याख्याता पदावर कार्यरत होते. त्यांनी एम.टेक.(संगणकशास्त्र) ही पदवी सुवर्ण पदकासह प्राप्त केली आहे. अध्यापनाचा त्यांना २८ वर्षेपेक्षा अधिक अनुभव आहे. तसेच लोणेरे येथील विद्यापीठात सहयोगी परीक्षा नियंत्रक म्हणून ६ वर्षे तसेच औरंगाबाद येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात एक वर्ष परीक्षा नियंत्रक म्हणून त्यांनी काम केले आहे.
सहा जुलै रोजी विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक प्रा.दीपक दलाल यांच्याकडून प्रा. पाटील यांनी पदभार स्वीकारला. प्रा. दलाल हे डिसेंबर, २०२१ पासून प्रभारी संचालक म्हणून काम पाहत होते. पदभार स्वीकारतांना कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी, प्र-कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे, अधिष्ठाता प्रा. अनिल डोंगरे, वित्त व लेखाधिकारी सीए रवींद्र पाटील, संचालक डॉ. राजेश जवळेकर यांच्यासह विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी उपकुलसचिव के.सी. पाटील व डॉ. मुनाफ शेख यांनी मनोगत व्यक्त केले.
Discussion about this post