जळगाव – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ येथील गणितशास्त्र प्रशाळेचे संचालक प्रा. किशोर फकीरा पवार यांची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी इंदिरा गांधी राष्ट्रीय जनजाती विद्यापीठ, अमरकंटक (मध्यप्रदेश) यांच्या कार्यकारी परिषदेवर नामनिर्देशन केले आहे.
विद्यापीठाच्या अधिनियमातील कलम ११ (ग) मधील तरतुदीनुसार १८ फेब्रुवारी २०२६ पासून पुढील तीन वर्षांसाठी हे नामनिर्देशन करण्यात आले आहे. प्रा. पवार हे गणित विषयाचे वरिष्ठ प्राध्यापक असून त्यांच्याकडे संचालक, आदिवासी अकादमी, नंदुरबार या पदाचा कार्यभार आहे. या अकादमीच्या माध्यमातून नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी बहुल भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात प्रोत्साहन दिले जाते. त्यांच्याकडे पीजी जिमखाना प्रमुख पदाची जबाबदारीही आहे.
यापूर्वी त्यांनी प्रभारी संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ; प्रभारी कुलसचिव; विद्या परिषद सदस्य तसेच विविध शैक्षणिक समित्यांवर काम केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ९ विद्यार्थ्यांनी पीएच.डी. पदवी प्राप्त केली असून ५ विद्यार्थी सध्या संशोधन करत आहेत. त्यांचे ५४ शोधप्रबंध प्रकाशित झाले असून ३ शोधप्रबंध आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सादर झाले आहेत. संशोधनासाठी शासनाकडून त्यांना मोठ्या प्रमाणात अनुदानही प्राप्त झाले आहे. तसेच ६ राष्ट्रीय परिषदांमध्ये त्यांनी व्याख्याने दिली आहेत.
शैक्षणिक कार्याबरोबरच ते क्रीडा क्षेत्रातही सक्रिय आहेत. सायकलिंग, बॅडमिंटन व क्रिकेट या खेळांमध्ये त्यांनी राष्ट्रीय व राज्यस्तरीय विद्यापीठ स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवला आहे. जळगाव जिल्ह्यातील विविध सामाजिक, सांस्कृतिक व क्रीडा संघटनांमध्येही ते कार्यरत आहेत.
या प्रतिष्ठित पदावर झालेल्या नामनिर्देशनाबद्दल विद्यापीठातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, व्यवस्थापन परिषद सदस्य, अधिसभा सदस्य, विद्या परिषद सदस्य आणि विविध शैक्षणिक व सामाजिक संघटनांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.















Discussion about this post