जळगाव । विद्यार्थी हा शिक्षकाचा आरसा असतो त्यातून शिक्षकाने विद्यार्थी कसे घडविले याचे प्रतिबिंब उमटत असते. विद्यार्थ्यांना घडवता घडवता मी घडत गेलो असे प्रतिपादन प्रा.पी.पी. माहुलीकर यांनी जीवन गौरव पुरस्कार स्वीकारतांना केले. तसेच प्रा. पी.पी. वडगावकर, पुणे यांना देखील जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला. विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी यांच्या हस्ते हे पुरस्कार आज दि. १९ सप्टेंबर रोजी देण्यात आले.
विद्यापीठात आयोजित “रसायनशास्त्र आणि तंत्रज्ञानातील नवीनतम विकासासाठी जागतिक संधी (GOLD CT)” या विषयावर दुसरी अंतरराष्ट्रीय परिषदेत हे पुरस्कार देण्यात आले. यावेळी मंचावर कुलगुरू प्रा.व्ही.एल. माहेश्वरी, प्र-कुलगुरू प्रा.एस.टी. इंगळे, सौ. शारदा माहुलीकर, सौ. वडगावकर, अशोक व सौ. विद्या शिंपी, प्रशाळेचे संचालक प्रा.डी.एच.मोरे व निमंत्रक प्रा.डी.एस.दलाल उपस्थित होते. प्रा. माहुलीकर यांनी पुढे सांगितले की, विद्यार्थी हे प्रेरणास्थान होते, शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. त्याकरीता संयम, उत्साही, दृढनिश्चय हे गुण आवश्यक होते व ते अंगीकारल्यामुळे विद्यार्थ्यांना घडविता आले. त्यांनी पुढे सांगितले की, सांगली जिल्ह्यातील माहुली या खेड्यात शेतकरी कुटुंबात जन्मलो. वडीलांची इच्छा मी नोकरी करावी अशी होती. मात्र मला संशोधन, शिष्यवृत्ती मिळाल्याने व दोन्ही पगाराच्या रक्कमा सारख्या असल्याने वडीलांना समजवून सांगितले व शिक्षकी पेशाकडे वळलो. प्रा. माहुलीकर यांची ३१ वर्षे सेवा झाली असून त्यांनी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू, बीसीयुडी संचालक, केमिकल सायन्सेस प्रशाळेचे संचालक अशी अनेक पदे आपल्या सेवाकाळात भुषविली आहेत.
प्रा. माहुलीकर यांच्यसा संदर्भात प्रा. नातू यांनी सांगितले की, ते शांत व उत्कृष्ट संशोधक आहेत. प्रा. एच.डी. नारखेडे, पी.के. कोटेचा महाविद्यालय, भुसावळ यांनी सांगितले की, प्रा.माहुलीकर यांच्याकडे पीएच.डी. करीत असतांना सरांमध्ये इच्छाशक्ती, ज्ञानशक्ती, क्रीयाशक्ती व कर्मशक्ती दिसून आली. सरांमुळे माझ्यासह २६ विद्यार्थी पीएच.डी. झालेत. तसेच केमिकल सायन्सेस प्रशाळेतील माजी प्रयोगशाळा सहायक अशोक शिंपी यांचाही सत्कार करण्यात आला.
प्रा. माहुलीकर यांच्या मानपत्राचे वाचन प्रा.डी.एच. मोरे तर प्रा.वडगावकर यांच्या मानपत्राचे वाचन प्रा.रत्नमाला बेंद्रे यांनी केले. सूत्र संचालन डॉ. जी.ए. उस्मानी यांनी केले, प्रा. डी.एस. दलाल यांनी आढावा मांडला.
या आंतरराष्ट्रीय परीषदेत आज सकाळच्या सत्रात सिनेट सभागृहात आयसीटी मुंबईचे माजी कुलगुरु पदम्श्री प्रा.जी.डी.यादव यांनी ऑनलाईन पध्दतीने बीजभाषण करतांना सांगितले की, ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर करून प्रदुषण पूणपणे नाहिसे करण्यासाठी काय उपाय योजना कराव्या लागतील याबाबत मत व्यक्त केले. त्यानंतर एनसीएल, पुणे येथील डॉ.एस.एन. माने, आयआयएससी बंगलोर येथील डॉ. फरसाराम, आयआयटी जोधपूर येथील डॉ. रोहन एरंडे, युएसए येथील सेंट्रल फ्लोरीडा विद्यापीठाच्या डॉ. प्रियंका मक्कार यांनी सादरीकरण केले. यावेळी अध्यक्ष म्हणून डॉ. अपुर्बा कोणार आयआयएसईआर, भोपाळ या होत्या. याच सभागृहात दुपारच्या सत्रात आयआयसीटी हैद्राबाद येथील डॉ. एस.व्ही. भोसले, अकाल विद्यापीठ भटींडा येथील डॉ. बुबून बॅनर्जी, युएसए येथील डॉ. राहुल सुर्यवंशी यांनी व्याख्याने दिलीत. यावेळी भावनगर येथील डॉ. राजाराम नगराळे हे अध्यक्ष होते.
विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात पोस्टर्स प्रझेंटेशनचे उद्घाटन विज्ञान व तंत्रज्ञान विद्या शाखेचे प्रभारी अधिष्ठाता प्राचार्य एस.एस. राजपूत यांच्याहस्ते आज सकाळी संपन्न झाले. विद्यार्थ्यांनी केमिकल सायन्सेस मधील विविध विषय या पोस्टर्स प्रेझेंटेशनद्वारे मांडले. पर्यावरणशास्त्र प्रशाळेच्या सभागृहात आयसीटी, मुंबई येथील डॉ. बी.एम. भांगे, एसआरटीएम विद्यापीठ, नांदेड येथील डॉ. अविनाश पुयाड, नवी दिल्ली येथील डॉ. एस.एल. सोनवणे, छत्रपती संभाजीनगर येथील प्रा. एम.के. लांडे यांची व्याख्याने झाली. या सत्राचे अध्यक्ष म्हणून आयआयसीटी हैद्राबाद येथील डॉ.एस.व्ही. भोसले यांनी काम पाहिले. याच सभागृहात दुपारच्या सत्रात नॉर्थ बंगाल विद्यापीठ दार्जिलिंग येथील डॉ. सजल दास व प्रा.दिश्वजीत सिन्हा यांची व्याखाने झाली. यावेळी छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. बापुराव शिंगाटे हे अध्यक्षस्थानी होते. तसेच दृकश्राव्य कक्षात सकाळ सत्रात पुणे येथील डॉ. डी.एन. बडगुजर यांनी व्याख्यान दिले. या सत्राचे अध्यक्ष छत्रपती संभाजीनगर येथील प्रा. आर.ए. माने हे होते. या परिषदेत ६४३ जण सहभागी झाले. यामध्ये १९४ पदव्युत्तर विद्यार्थी, २४२ संशोधक विद्यार्थी, १८७ ॲकेडमीशीयन, १० उद्योजक आदींचा समावेश आहे. परदेशातील १० तज्ज्ञ देखील या परिषदेत सहभागी झाले होते. या परिषदेच्या यशस्वीतेसाठी विविध समित्या गठीत करण्यात आल्या होत्या. तसेच केमिकल सायन्सेस प्रशाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, संशोधक व विद्यार्थी/विद्यार्थिनी यांनी परिश्रम घेतले.















Discussion about this post