जळगाव । जळगाव शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत शिंदे गटाच्या शिवसेनेनं हॅट्रिक मारली असून प्रभाग क्रमांक ९ मधून प्रतिभा गजाजन देशमुख यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. प्रतिमा देशमुख या दुसऱ्यांदा महापालिकेच्या सभागृहात नगरसेवक म्हणून प्रवेश करणार आहेत.
जळगाव महापालिकेच्या निवडणुकीत बिनविरोध उमेदवारांच्या शर्यतीत शिवसेनेने आपली ताकद दाखवून दिली आहे. छाननी प्रक्रियेत भाजपच्या उज्वला बेंडाळे या बिनविरोध झाल्यानंतर, अर्ज माघारीच्या टप्प्यात शिवसेनेने आघाडी घेतली. या प्रक्रियेत पक्षाने सलग तीन उमेदवार बिनविरोध करून राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय निर्माण केला आहे.
आज प्रभाग क्रमांक 18-अ मधून शिवसेनेचे आमदार चंद्रकांत सोनवणे यांचे चिरंजीव गौरव सोनवणे तर प्रभाग क्रमांक 9 ‘अ’ मधून मनोज चौधरी यांची बिनविरोध निवड झाली. यांनतर आता प्रभाग 9 ‘ब’मध्ये प्रतिभा देशमुख यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.
त्यांच्या समोर माजी नगरसेविका प्रतिभा पाटील या अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात होत्या. मात्र, त्यांनी माघार घेतल्याने देशमुख यांचा विजय निर्विवाद ठरला. प्रतिमा देशमुख या दुसऱ्यांदा महापालिकेच्या सभागृहात नगरसेवक म्हणून प्रवेश करणार आहेत. यापूर्वी त्यांनी प्रभागातील विकासकामांमध्ये सक्रिय सहभाग घेतला होता. त्यांच्या बिनविरोध निवडीमुळे शिवसेनेच्या संघटनात्मक ताकदीला नवे बळ मिळाले असून, पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.















Discussion about this post