नगर । लोकसभा निवडणुकीसाठी प्रचार सभेला वेग आला असून यादरम्यान एकमेकांवर टीकेचे बाण सोडले जात आहे. यातच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी घराणेशाहीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींसह विरोधी पक्षांवर जोरदार हल्लाबोल केला. नरेंद्र मोदींची धोरणे देश बुडवणारी असून, या धोरणामुळे देश कणाहीन होत चालला आहे. मोदी सत्तेवर येण्याआधी देशावर १०० रुपयापैकी २६ रुपयांचे कर्ज होते. ते सत्तेवर आल्यानंतरच्या १० वर्षात हे कर्ज आता ८४ रुपयांचे झाले आहे. व आता पुन्हा सत्तेवर आल्यास ते ९६ रुपयांवर जाईल. यामुळे मतदारांनी आता देशातील घराणेशाही आधी संपवण्याची गरज असल्याचे मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.
हाच खेळ त्यांचा वर्षानुवर्षे चालू
काँग्रेसने मुस्लिम, धनगर, माळी, लिंगायत वा अन्य किती जणांना उमेदवारी दिली, असा सवाल करून आंबेडकर म्हणाले, त्यांनी सर्व घराणेशाही व श्रीमंत मराठ्यांना उमेदवारी दिली आहे. हाच खेळ त्यांचा वर्षानुवर्षे चालू आहे व त्यामुळे देशाचा विकास होत नाही. भाजप, काँग्रेस, शिंदे सेना, ठाकरे सेना, दोन्ही राष्ट्रवादी या सर्वांचे उमेदवार घराणेशाहीचे असल्याचा आरोप आंबेडकर यांनी केला.
आताचे त्यांचे उमेदवार हे नात्यागोत्यातील
सत्ताधारी आणि विरोधकांनी मराठ्यांना उमेदवारी दिली. मात्र, हे मराठा हे श्रीमंत आणि घराणेशाहीतील आहे. मराठा आरक्षणासाठी लढा देणार्या मनोज जरांगे यांच्या सोबत असणार्या मराठ्यांना त्यांनी का उमेदवारी दिली नाही. आताचे त्यांचे उमेदवार हे नात्यागोत्यातील आहे. एकाच शरिरातील उजवा सत्ताधार्यांकडून तर डाव्याला विरोधकांनी उमेदवारी दिलेली आहे. यामुळे कोणीही निवडून आले तरी शरिराचे नुकसान होणार नाही. आतापर्यंत हाच खेळ सुरू असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
Discussion about this post