अकोला : मागच्या काही दिवसापूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील अनेक ठिकाणी शेती पिकांसह घरांचं, जनावरांचे अतोनात नुकसान झाले. हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. यातच ओल्या दुष्काळाच्या मुद्द्यावरून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज राज्य सरकार आणि मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली.
राज्यात अतिवृष्टीने प्रचंड नुकसान झाले असताना ओला दुष्काळ जाहीर करण्यात वेळ का लावताय? ओला दुष्काळ जाहीर झाल्याशिवाय शासन कोणत्याही उपाय योजनांना परवानगी देऊ शकत नाही. पूर परिस्थिती ओसरल्यानंतर ओला दुष्काळ जाहीर करता येत नाही; असा नियम सांगत सरकारचे सर्वेक्षण आणि इतर कोणत्याच गोष्टी झालेल्या नसतांना शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार? असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला.
नाव न घेता ठाकरेंवर निशाणा
दरम्यान, सातबारा कोरा करण्याच्या राजकीय पक्षांच्या मागणीवर देखील आंबेडकरांनी सर्वच राजकीय पक्षांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केले आहे. कारण आता कर्जमाफीची मागणी करणाऱ्यांनी ते मुख्यमंत्री असतांना काय केलं?, असा सवाल करीत त्यांनी उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता टीका केली.
दरम्यान, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप सोडून इतर कोणाचीही स्थानिक पातळीवर एकत्र येण्यासाठी पक्षाच्या स्थानिक नेतृत्वाला मुभा दिली असल्याचं ते म्हणाले. महायुतीतील शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांच्यासोबत युती करण्यातही आपली कोणतीही हरकत नसल्याचं ते म्हणालेय.















Discussion about this post