मुंबई । अवघ्या दोन-अडीच महिन्यांवर आलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्षांनी कसून तयारी सुरू केली असून विविध दौरे, यात्रा आणि योजनांद्वारे सर्वच जण मतदारांना खुश करण्याचा प्रयत्नात आहेत. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकरही विधानसभा निवडणुकीच्या तयारीत व्यस्त असून त्यांनी त्यांचं टार्गेट काय असेल, किती जागांची चाचपणी सुरू आहे याबाबत एका वृत्तवाहिनीशी बातचीत केली.
लोकसभा निवडणुकीदरम्यान प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीमध्ये सहभागी झाले नाहीत पण त्यांनी काँग्रेसला पाठिंबा दर्शवला होता. हेच चित्र विधानसभा निवडणुकीतही दिसणार का ? असा सवाल त्यांना विचारला.
यावर बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट शब्दांत नकार दिला. तेव्हा काँग्रेसने फोन करून आमच्याकडे पाठिंबा मागितला होता. मात्र यावेळेस काही नाहीये. विधानसभेत आमचा कोणालाही पाठिंबा नसेल. वंचित बहुजन आघाडी आणि मित्र पक्ष मिळून एकत्र निवडणूक लढवतील, त्यांनाच पाठिंबा आहे, दुसऱ्या कोणालाही नाही ,असं त्यांनी स्पष्ट केलं.
विधानसभा निवडणुकीत किती जागांसाठी चाचपणी करणार असे विचारले असता, चाचपणी नव्हे तर आम्ही एका आघाडी उभी करत आहोत. त्यातील सर्वात मोठी आघाडी ती आदिवासी समजाची आघाडी आहे. दोन वेगवेगळ्या आघाड्या मिळून एक नवी आघाडी उभी करतोय.
मोठ्या नेत्यांविरोधात वंचितचे उमेदवार राहणार उभे ?
देवेंद्र फडणवीस,आदित्य ठाकरे, नाना पटोले, विजय वडेट्टीवार यांच्यासारखे राज्यातले मोठे नेते विधानसभा निवडणुकीत उभे राहतील, त्यांच्याविरोधात वंचितचा उमेदवार असणार का ? त्यावर आंबेडकर म्हणाले, ‘कोण मोठा आणि कोण छोटा हे लोकं ठरवत असतात. त्या मतदारसंघात जो कोणी लढणारा असेल त्याचा पूर्ण अभ्यास करून, तो योग्य वाटल्यास आम्ही त्याला उमेदवारी देऊ. तो मोठा आहे की लहान, हे काही आम्ही तेव्हा पाहणार नाहीयोत. ‘ असे त्यांनी नमूद केले.















Discussion about this post