मुंबई । आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. यातच विरोधी पक्षातील नेते पदाधिकारी सत्ताधणाऱ्यांच्या गटात प्रवेश करताना दिसत आहे. मात्र यावेळी एकनाथ शिंदे गटाला मित्र पक्ष असलेल्या भाजपने मोठा धक्का दिला आहे. यवळमाळमध्ये उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हजारो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे. राळेगाव विधानसभा मतदार संघातील नाराज पदाधिकाऱ्यांनी हजारो कार्यकर्त्यांनी शिंदे गटातून भाजपमध्ये प्रवेश केल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे यवतमाळमध्ये शिंदेसेनेला खिंडार पडल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, राळेगांव विधानसभा मतदार संघातील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके आणि भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याध्यक्ष प्रफुल चव्हाण यांच्या नेतृत्त्वात हजारो शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपामध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. यवतमाळच्या शासकीय विश्रामगृहात हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला.
महायुतीमध्ये सर्वकाही आलबेल असतानाही मध्येच अंतर्गत कुरघोडी सुरु असल्याच्या चर्चा पाहायला मिळतात. अंतर्गत कुरघोडीचे राजकारण आणि ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चांमुळे एकनाथ शिंदे कोंडीत सापडले आहे. यातून बाहेर पडण्यासाठी शिंदे यांनी अमित शाह यांची भेट घेतली आणि मुख्यमंत्रीपदाचा प्रस्ताव मांडल्याचा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी केला आहे.
महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रिपदासाठी जोरदार फिल्डिंग लावल्याची चर्चा होती. पण भाजपने जास्त जागा मिळवल्याने देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात आपसूकचे मुख्यमंत्रिपदाची माळ पडली. त्यानंतर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री बनले पण त्यांचा प्रभाव कमी होत असल्याचे पाहायला मिळाले. आता दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत असल्याने शिंदे आणखी अस्वस्थ असल्याच्या चर्चा सुरु आहेत.
Discussion about this post